‘डॉन’, ‘डॉन २’ चित्रपटाच्या यशानंतर ‘डॉन ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. पण, फरहान अख्तरच्या बहुप्रतीक्षित ‘डॉन ३’ चित्रपटाचं चित्रीकरण सतत पुढे ढकललं जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी एकत्र काम करणार होते. मात्र, कियाराचा ‘डॉन ३’ चित्रपटातून पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे. कियाराची जागा एक मराठमोळी अभिनेत्री घेणार आहे. जिचा संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी आहे.

लवकरच आई होणाऱ्या कियारा अडवाणीची ‘डॉन ३’ चित्रपटातून एक्झिट झाली आहे. त्यामुळे तिच्या जागी आलिया भट्टची को-स्टार, २०२४ बॉलीवूड गाजवणारी मराठी अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ‘डॉन ३’ चित्रपटात रणवीर सिंहबरोबर झळकणारी ही मराठी अभिनेत्री कोण आहे? आणि चित्रपटाचं चित्रीकरण कधी सुरू होणार? जाणून घेऊयात…

काही महिन्यांपूर्वी कियारा अडवाणीने लवकरच आई होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत कियाराने ‘डॉन ३’ चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. म्हणून ‘डॉन ३’च्या निर्मात्यांनी कियाराच्या जागी महाराष्ट्राचे माजी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीची नात म्हणजे अभिनेत्री शर्वरी वाघची निवड केली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटासाठी शर्वरीचं नाव निश्चित झालं आहे. तसंच निर्माते या फ्रेंचाइजीचा तिला भाग बनवण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

‘डॉन ३’च्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होणार?

माहितीनुसार, ‘डॉन ३’ चित्रपटाचं चित्रीकरण २०२५च्या अखेरपर्यंत सुरू होऊ शकतं. या चित्रपटातील डॉनच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह ठरला आहे आणि आता त्याच्याबरोबर शर्वरीचं नाव प्रमुख भूमिकेसाठी घेतलं जात आहे. पण, अजूनपर्यंत चित्रपटाच्या कास्टिंग संदर्भात अधिकृतरित्या निर्मात्यांनी भाष्य केलेलं नाही.

दरम्यान, शर्वरी वाघच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटामुळे शर्वरी अधिक प्रसिद्धी झोतात आली. सध्या शर्वरी आगामी चित्रपट ‘अल्फाच्या’ चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसह पाहायला मिळणार आहे.