यंदा भारतीय चित्रपटांच्या ऑस्करवारीवरून बरेच वाद झाले. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’सारख्या जबरदस्त गाजलेल्या चित्रपटांना सोडून एका गुजराती चित्रपटाला ऑस्करला पाठवल्याने बरेच लोक नाराज झाले. मध्यंतरी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला पुढील ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं वृत्त समोर आलं होतं. नुकताच हा चित्रपट ‘ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड (BAFTA) २०२२’ या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी सज्ज होत आहे.
हा चित्रपट चांगलाच गाजला आणि आलियाच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीने आलियाच्या या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचा भाग होता न आल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून कियारा आडवाणी आहे.
Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कियाराने याविषयी खुलासा केला आहे. कियारा म्हणाली, “हा चित्रपट पाहताना माझी पापणीदेखील लवली नाही. आलियाने अप्रतिम काम केलं आहे शिवाय संजय भन्साळी यांनीदेखील अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने त्याचं सादरीकरण केलं आहे. मला अशा अप्रतिम प्रोजेक्टचा हिस्सा व्हायला नक्कीच आवडलं असतं. ही एक खंत मनात आहे.”
कियाराला नुकतंच संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसपाशी पाहण्यात आलं होतं. कियारा भन्साळी यांच्याबरोबर पुढील चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे. कियारा विकी कौशलबरोबर ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातून झळकणार आहे. शिवाय सध्या तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. अजून त्या दोघांनी यावर काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही.