हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन ही भारतात आली होती. किमने उद्योजक मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात विशेष उपस्थिती दर्शवली होती. या लग्न सोहळ्यातले काही फोटो किमने शेअर केले. त्यातले फोटो गणपतीच्या मूर्तीसह आहेत. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ज्यानंतर तिने हा फोटो हटवला आहे.

नेमकं काय घडलं?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात किमने एक खास पोशाख परिधान केला होता. त्यात तिने फोटो काढले. ज्यातला एक फोटो गणपती बाप्पाच्या मूर्तीसह होता. त्यावरुन लोकांनी तिला खडे बोल सुनवण्यास सुरुवात केली. तसंच मुकेश अंबानी यांनाही टॅग करुन तुमच्याकडे आलेल्या पाहुणीला जरा पद्धत शिकवा असंही सांगू लागले. या फोटोत गणपतीच्या मूर्तीचा आधार घेत किमने फोटो काढले होते. लोकांनी तिला लगेच हे ऐकवण्यास सुरुवात केली की ती गणपतीची मूर्ती आहे एखादा खांब किंवा फोटो काढण्यासाठीचा आधार नाही. प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर किमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो डिलिट केला आहे.

हे पण वाचा- Kim Kardashian : लाल शिमरी साडी, डीपनेक ब्लाऊज…; अनंत अंबानीच्या लग्नात किम कार्दशियनचा लूक चर्चेत

किमने फोटो पोस्ट केला होता, पण ट्रोलिंगनंतर डिलिट केला

मुंबईतील अंबानींच्या लग्नसोहळ्यात किम कार्दशियनने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या ऑफव्हाईट लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात तिने एक सुंदर फोटोशूट केलं. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “अंबानीच्या लग्नासाठी हिरे आणि मोती” असं कॅप्शन दिलं होतं. तिने हे फोटो पोस्ट केल्यावर ते तातडीने व्हायरल झाले. किम कार्दशियनचा हा भारतीय लूक नेटिझन्सना आवडला, पण तिच्या एका फोटोकडे अनेक फॉलोअर्सचं लक्ष गेलंच. या फोटोमध्ये किम कार्दशियन गणपतीच्या मूर्तीचा फोटो ‘प्रॉप’ (फोटो काढताना घेतलेला आधार) म्हणून वापर करताना दिसत होती. या फोटोमध्ये किम श्रीगणेशाच्या मूर्तीवर वाकून पोज देताना दिसत होती. किमचा हा फोटो व्हायरल झाला आणि तिला ट्रोल करण्यात आलं. ज्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण न देता शांतपणे तिच्या पोस्टवरून फोटो काढून टाकला आहे. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. हेमिश पटेल यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.

किम कार्दशियनचा हाच तो फोटो आहे ज्यावरुन नेटकरी तिच्यावर संतापले होते. कुठलंच स्पष्टीकरण न देता तिने हा फोटो डिलिट केला आहे.

लोकांनी काय कमेंट केल्या?

गणपतीच्या मूर्तीसह किम कार्दशियनची अशी पोज आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देऊ लागले. किमच्या पोस्टवर कमेंट करत भारतीय नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं. एक यूझर म्हणाला, ही अमेरिकेतून आली आहे, गणपतीच्या मूर्तीसह अशी पोज देऊन उभी आहे. तिला महत्त्व वाटत नसेल पण आम्हाला वाटतं. दुसरा एक युजर म्हणाला अंबानी त्यांच्या पाहुण्यांना काही पद्धत शिकवणार नाही का? एकाने असंही लिहिलं की किमने फोटो काढण्याआधी कुणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. ‘हिला कुणीतरी सांगा श्री गणेशाची मूर्ती आहे, कोणतं प्रॉप नाही, ज्यासह असा फोटो काढता येईल. अशा विविध कमेंट तिच्या फोटोवर आल्या. ज्यानंतर किमने हा फोटो डिलिट केला.