Mamta Kulkarni Expelled By Kinnar Akhara Founder: ममता कुलकर्णीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ममता कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच महाकुंभमेळ्यात (Mahakubh 2025) संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ममताला महामंडलेश्वर बनवलं जाईल अशी घोषणा झाली. यासाठी ममताने संगममध्ये पिंड दानाचा विधी केला; मग किन्नर आखाड्यात ममताचा राज्याभिषेक झाला. महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले होते. तसेच किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद तिला देण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यात आलं होतं. पण आता किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवलं आहे. इतकंच नाही तर तिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. तसेच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनादेखील आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. किन्नर आखाड्याला लवकरच नवे आचार्य महामंडलेश्वर मिळतील. या दोन्ही व्यक्तींची हकालपट्टी केल्यानंतर आखाड्याची नव्याने पुनर्रचना केली जाईल, अशी माहिती ऋषी अजय दास यांनी दिली.

किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीची आखाड्यातून हकालपट्टी केली. देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे.

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यात आल्याने बराच वाद झाला. तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती. ममताला महामंडलेश्वर बनवण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. काही लोक एकाच दिवसात संत झाले आणि महामंडलेश्वर पद मिळवले, अशी टीका तिच्यावर झाली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही ममताला हे पद मिळाल्यावर नाराजी व्यक्त केली होती. एका महिलेला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवणं नियमांविरोधात आहे, असं स्वतः किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास म्हणाले होते. एकूणच या नाराजी नाट्यानंतर ममताकडून महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं व तिला किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं.

ममताला महामंडलेश्वर पद देण्यात आले, तेव्हाचा फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

ममताने १९९१ मध्ये ‘नानबर्गल’ या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. ममताने तिच्या करिअरमध्ये एकूण ३४ चित्रपट केले. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘नसीब’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘क्रांतीवीर’, ‘आंदोलन’, ‘छुपा रुस्तम’, ‘घातक’, ‘वक्त हमारा है’, ‘बाजी’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kinnar akhara founder expelled mamta kulkarni laxmi narayan mahamandaleshwar hrc