‘खुदगर्ज’, ‘तेजाब’ आणि ‘खुदा गवाह’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी करिअरमध्ये बी व सी ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांना ते चित्रपट केल्याचा कोणताही पश्चाताप नाही. त्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या निर्णयावर ते आजही कायम आहेत. कारण त्याच चित्रपटांनी आपल्याला स्वप्नातलं घर बांधण्यास मदत झाली, असं ते सांगतात. या चित्रपटांबाबत कुटुंबियांना माहीत होतं का, त्यामुळे कशी मदत झाली, याबाबत किरण यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.
मुख्य प्रवाहातील उत्तम चित्रपटांमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर महत्त्वाच्या भूमिका केल्यानंतर बी आणि सी-ग्रेड चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती, असं किरण कुमार यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगली बातमी सांगाल तेव्हा ते तुमच्या आनंदात सामील होतील. पण जेव्हा तुम्ही फक्त पैशासाठी काम करता, जसे मी काही चित्रपटांमध्ये केले होते, तेव्हा तुम्ही स्वतःच्या झोनमध्ये मागे जाता. हे नकारात्मक क्षेत्र नाही, पण तुम्ही जे करताय ते तुम्ही स्वीकारूही शकत नाही. अशा परिस्थितीत त्या भावना पत्नीला सांगितल्या असत्या तर ती अस्वस्थ झाली असती.” यांसदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलंय.
किरण म्हणाले की त्यांनी आपल्या पत्नीपासून खऱ्या भावना लपवल्या. “जेव्हा मी माझा पर डेचा लिफाफा घरी आणायचो तेव्हा मला वाईट वाटायचं, पण मी माझ्या चेहऱ्यावर हसू ठेवून ते तिला द्यायचो,” असं म्हणत त्यांनी घराबाहेरील खांबांकडे हात दाखवला. “त्या प्रत्येक खांबाची किंमत ४ लाख रुपये आहे आणि असे एकूण ११ खांब आहेत. माझ्या घरातील खांबांची किंमत ४४ लाख रुपये आहे,” असं त्यांनी सांगितलं.
करिअरमध्ये खराब टप्प्यातून जाताना ते घर बांधलं होतं अशी आठवण त्यांनी सांगितली. “हे घर बांधायला मला सहा वर्षे लागली. मी पैसे गोळा करत राहिलो. मला पैसे मिळाल्यावर, मी ते घराच्या अमूक एका भागावर खर्च करेन असा विचार करायचो. आणि हे सर्व माझ्या बी आणि सी-ग्रेड चित्रपटांमुळे शक्य झाले. मी कधीही त्या चित्रपटांबद्दल काहीच बोलणार नाही, कारण त्यांनीच मला माझ्या आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यास मदत केली. मला त्या चित्रपटांचा जितका अभिमान आहे तितकाच मला ‘खुदगर्ज’, ‘तेजाब’ आणि ‘खुदा गवाह’चा आहे,” असं ते म्हणाले.
किरण कुमार यांनी करिअरमध्ये हिंदी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक टीव्ही शोदेखील केले आहेत. एकेकाळी चित्रपटांमध्ये पोलीस किंवा खलनायकाच्या भूमिका साकारणारे किरण नुकतेच शिल्पा शेट्टीची मुख्य भूमिका असलेल्या ‘सुखी’ चित्रपटात झळकले होते.