किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाचं जगभरातून खूप कौतुक करण्यात आलं. या चित्रपटाला आणि त्यामधील कलाकारांना बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. एवढंच नव्हे तर ‘लापता लेडीज’ चित्रपट ९७व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पाठवण्यात आला होता. तसंच गेल्या महिन्यात पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार २०२५’ मध्येही ‘लापता लेडीज’ चित्रपटाने तब्बल १० पुरस्कार जिंकले. असा हा सर्व स्तरातून कौतुक झालेला किरण रावचा चित्रपट एका विदेशी चित्रपटाची कॉपी असल्याचं म्हटलं जातं आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप नेटकरी किरण राववर करत आहेत.

‘बुर्खा सिटी’ नावाच्या विदेशी चित्रपटाची कॉपी किरण रावने केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत; ज्यामध्ये ‘लापता लेडीज’ची कथा चोरल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हापासून किरण रावचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘रेडिट’च्या पोस्टमुळे हा वाद निर्माण झाला आहे.

‘रेडिट’वरील काही पोस्टमध्ये Fabrice Bracq ची १९ मिनिटांची शॉर्ट फिल्म ‘बुर्खा सिटी’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मिडल इस्टवर आधारित या चित्रपटात एक नवविवाहित पुरुषाची कथा आहे; ज्याच्या बायकोची बुरख्यामुळे आदला-बदली होते. त्यानंतर तो आपल्या बायकोला शोधण्यासाठी निघतो. त्यामुळेच अनेक नेटकऱ्यांना ‘बुर्खा सिटी’ची कथा ‘लापता लेडीज’ चित्रपटासारखी वाटतं आहे. दोघांमध्ये फरक एवढाचं आहे की, ‘लापता लेडीज’मध्ये घूंघट आहे आणि ‘बुर्खा सिटी’मध्ये बुर्खा आहे.

Photo Credit - Reddit
Photo Credit – Reddit

त्याशिवाय ‘लापता लेडीज’ची कथा ‘घूंघट के पट खोल’ चित्रपटाचीसारखी असल्याचं देखील अनेक नेटकरी म्हणत आहेत. १९९९ मध्ये ‘घूंघट के पट खोल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचं दिग्दर्शन अनंत महादेव यांनी केलं होतं. यासंदर्भात २०२४मध्ये अनंत महादेवन यांनी स्वतः एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये ते नाव न घेता म्हणाले होते की, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ( लापता लेडीज ) कथा त्यांच्या चित्रपटासारखीच आहे. आता ‘लापता लेडीज’ चित्रपटाची कथा दोन चित्रपटांसारखी असल्यामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हे लज्जास्पद असल्याचं नेटकरी म्हटलं आहे.

Netizens Comments
Netizens Comments

एका नेटकऱ्याने लिहिलं, “‘लापता लेडीज’ चित्रपटाला ऑस्कर्ससाठी पाठवलं होतं. त्याच्या पेक्षा ओरिजनल कथा असलेल्या चित्रपटाला तरी निवडलं असतं.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे खूप लज्जास्पद आहे. हुबेहूब सीन्स कॉपी केले आहेत.” दरम्यान, या वादावर किरण रावची अधिकृतरित्या प्रतिक्रिया आलेली नाही.