बॉलीवूडमधील आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दिग्दर्शिका म्हणून किरण रावला ओळखले जाते. ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘रुबरू रोशनी’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले आहे. नुकतेच तिने ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले, मात्र बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला.
काय म्हणाली किरण राव?
किरण रावने नुकतीच फाये डिसूझा यांना मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य केले आहे. ‘लापता लेडीज’ आणि ‘धोबी घाट’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीत, हे अपयश असल्याचे तिने म्हटले आहे. ती म्हणते, ‘धोबी घाट’ आणि ‘लापता लेडीज’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकले नाहीत. ‘धोबी घाट’ने त्या काळाच्या तुलनेत चांगली कमाई केली होती. पण, १०-१५ वर्षांनंतर ‘लापता लेडीज’ने त्या तुलनेत काहीच कमाई केली नाही. त्यामुळे मला अपयशी झाल्यासारखे वाटते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अयशस्वी ठरला. हे दोन्ही १०० कोटी नाही पण ३०, ४०, ५० कोटीदेखील हे चित्रपट कमवू शकले नाहीत आणि या अपयशाची जबाबदारी मला माझी वाटते. ‘धोबी घाट’च्यावेळी मला हे जास्त जाणवले होते, कारण प्रेक्षकांसमोर हा चित्रपट वेगळ्या पद्धतीने आणण्याचे कोणतेही माध्यम त्यावेळी उपलब्ध नव्हते. आता जसे ओटीटीचे माध्यम आहे, त्यावेळी तसे कोणतेही पर्यायी माध्यम नव्हते. मला वाटते हा चित्रपट त्या काळाच्या मानाने वेगळा होता. चित्रपटगृहात तो चित्रपट प्रदर्शित करणे सामान्य नव्हते. मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही, हे मला माझे अपयश वाटते.
हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीने शोधून काढलंच! सुभेदारांच्या घरी पोहोचली प्रतिमा; लेकीला पाहताच पूर्णा आजीला अश्रू अनावर
किरण राव पुढे म्हणते, अपयश ही अशी भावना आहे, जी मला रोज जाणवते. गेल्या दहा वर्षांपासून मी सतत काम करत आहे. मी सतत कामात असते. पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला वाटले, माझा दुसरा चित्रपटदेखील लवकर येईल. पण, तसे काही घडले नाही आणि मला हे रोज जाणवते. कोरी पाने, पूर्णविराम देऊन हा शेवट असं म्हणण्याची अक्षमता. या सगळ्याशी मी गेली दहा वर्षे संघर्ष करत आहे आणि तो संघर्ष अथक आहे, सतत सुरू आहे. ज्या लोकांमध्ये जास्त कलागुण असतात, ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळे निर्मिती करण्याची क्षमता असते; अशा लोकांना लवकर पुरेसे यश मिळाले नाही किंवा ते त्यांना हवे ते ध्येय पूर्ण करू शकले नाहीत, तर माझा विश्वास आहे की अशा अनेक लोकांना दररोज अपयशी झाल्यासारखे वाटत असेल.
दरम्यान, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, मात्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते.