आमिर खान व किरण राव २०२१ मध्ये विभक्त झाले. २००५ मध्ये लग्न केल्यावर १६ वर्षांचा दोघांनी संसार केला आणि मग त्यांनी घटस्फोट घेतला. आता किरण रावने घटस्फोट, नातं संपल्यानंतरची मैत्री व आदर, तसेच आमिरच्या कुटुंबाशी असलेलं तिचं नातं, याबाबत भाष्य केलं आहे.
“आम्ही खूप सहज विभक्त झालो, कारण आम्ही त्या टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे आम्ही घटस्फोट घेण्यास तयार होतो. आम्ही आमचं लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हाही तो निर्णय खूप विचारपूर्वक घेतला होता. आम्ही कधीच भांडलो नाही. आमच्यात वाद व्हायचे, पण १२ तासांत आम्ही ते सोडवायचो. आपले आपल्या आई-वडिलांशी होतात, तसेच काहिसे हे मतभेद असायचे,” असं किरण राव फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
“आम्हाला माहीत होतं की घटस्फोट घेत असलो तरी या नात्यात खूप काही वाचवायचं आहे. आम्हाला सगळं संपवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही ते अचानक ते नातं संपवलं नाही, आम्ही आमचा वेळ घेतला आणि मग निर्णय घेतला. निर्णय घेताना आझादवर त्याचे भावनिक परिणाम होणार नाही याची काळजीदेखील घ्यायची होती,” असं किरण म्हणाली.
हेही वाचा – एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
घटस्फोटानंतरही एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर कायम आहे, असं किरणने नमूद केलं. “आम्हाला एकत्र संसार करायचा नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांना आवडत नाही किंवा प्रेम करत नाही. कोणत्याही वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी असतात. काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो, काही गोष्टी ट्रिगर करतात ज्यामुळे सारखी भांडणं होतात, पण तुम्ही याच व्यक्तीशी लग्न केलेलं असतं आणि तुम्हाला तिच्याबद्दल काही गोष्टी आवडतही असतात,” असं किरण म्हणाली.
“आमिर माझा मित्र आहे, अनेक गोष्टींमध्ये तो माझा गुरू आहे. तो माझी सपोर्ट सिस्टीम आहे आणि ती नेहमीच मला गरज असताना माझ्यासाठी असतो. पण असेही दिवस येतात जेव्हा तो मला चिडवतो. शेवटी, तुम्हाला काय धरून ठेवायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला नकारात्मक व वाईट गोष्टी धरून ठेवायच्या आहेत की इतक्या वर्षांत कशामुळे तुमचं नातं टिकलं त्या गोष्टी धरून ठेवायच्या आहेत. आम्ही आमच्या नात्यातील सर्वोत्तम गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आणि ज्या गोष्टी आवडत नव्हत्या, त्या घटस्फोटाबरोबर सोडून दिल्या,” असं किरण म्हणाली.
किरण व आमिरचे कुटुंबीय अजूनही एकत्र आनंदाने राहतात. “त्याची आई अजूनही माझी सासू आहे आणि त्याची मुलं (जुनैद आणि आयरा) माझे मित्र आहेत आणि मला खूप प्रिय आहेत,” असं किरण म्हणाली.