बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची ओळख आहे. एकापेक्षा एक चित्रपट व अभिनयाच्या जोरावर निर्माण झालेला चाहतावर्ग, वेगळ्या धाटणीचे चित्रपटाचे विषय आणि भूमिका यासाठी आमिर खान(Aamir Khan) ओळखला जातो. तीन दशकांहून जास्त काळ चित्रपटांत काम करत मनोरंजनसृष्टीत महत्वाचे योगदान देणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. पण, जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले त्यावेळी आमिर खानची ओळख फार मोठी नव्हती. आता त्याच्या एका सहकलाकाराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत १९८४ ला प्रदर्शित झालेल्या ‘होली’ चित्रपटातील शूटिंगदरम्यानची आठवण सांगितली आहे. किटू गिडवानी व आमिर खानने या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती.
काय म्हणाली अभिनेत्री?
किटू गिडवानी ‘होली’ चित्रपटातील भूमिका कशी मिळाली, याची आठवण सांगताना अभिनेत्रीने म्हटले, “त्या काळात आमिर खान कोणीही नव्हता. चित्रपट निर्माते केतन मेहता यांनी मला विचारले की तू अलिकडे बहुतेकदा मला फिल्म इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये दिसली आहे. तर मी म्हटले हो मी विद्यार्थ्यांवर चित्रपट करत आहे. त्यानंतर अचानक त्यांनी विचारले तू होली(Holi)मध्ये काम करणार का? मी त्यांना विचारले की होली काय आहे? तर ते म्हणाले की मी हा चित्रपट करत आहे. मी या चित्रपटात कॉलेजमधील सर्वात सुंदर तरूणीची भूमिका निभावली होती. त्या काळात आम्ही पैशासाठी काम करत नसू. जे आवडेल ते करत असू. या चित्रपटातील माझी भूमिका छोटी होती.”
आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्रीने म्हटले, “त्यावेळी त्याने नुकतेच चित्रपटात काम करायला सुरूवात केली होती. चित्रपटांवर प्रेम करणारा, सर्जनशील व्यक्ती म्हणजे आमिर खान आहे. आमिर खान कोण आहे, याची त्यावेळी मला थोडीदेखील कल्पना नव्हती.खूप शांत व प्रेमळ होता. एका किसिंग सीनच्या वेळी तो खूप घाबरला होता. जितकी मी घाबरले होते, तितकाच तोही घाबरला होता. त्यावेळी तो अत्यंत साधा होता. मी त्याला मित्र म्हणू शकते.
होली या चित्रपटात किटू गिडवानी व आमिर खान यांच्याबरोबरच नसीरुद्दीन शाह व आशुतोष गोवारीकर हेसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी यामध्ये प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे. नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र किटू गिडवाणीने त्यांना गुरूसमान मानले. अभिनेत्रीने म्हटले, “नसीर जेव्हा त्याच्या सहकलाकारांसमोर येतो तेव्हा तो शांत नम्र असतो. नसीरसाठी काम ही पूजा आहे. तो आमचा मित्र होता, पण मी त्याला माझे गुरू म्हणून पाहिले”, असे म्हणत अभिनेत्रीने नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.
केतन मेहता दिग्दर्शित हा चित्रपट आमिर खानच्या पहिल्या काही चित्रपटांपैकी एक होता. दरम्यान, आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असल्याचे दिसत आहे. लवकरच तो ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.