कलाकार हे त्यांच्या कलाकृतींमुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. आता प्रसिद्ध भारतीय दिवंगत गायक ज्यांना के के या नावाने ओळखले जायचे, १९९६ साली २५ ऑक्टोबरला त्यांनी बॉलीवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी गूगलने त्यांचे डूडल बनवले आहे. ‘छोड आये हम’ या गाण्यातून त्यांंनी पदार्पण केले होते.
दिवंगत गायकाला अभिवादन करण्यासाठी गूगलचे खास डूडल
गूगलने शेअर केलेल्या डूडलमध्ये के के मग्न होऊन गाताना दिसत आहेत. हे डूडल शेअर करताना गूगलने लिहिले, “कृष्णकुमार कुन्नथ, ज्यांना के के म्हणूनही ओळखले जाते. अष्टपैलू म्हणून प्रसिद्ध असलेले पार्श्वगायक अशीही त्यांची ओळख आहे. या दिवशी १९९६ ला के के यांनी ‘माचिस’ चित्रपटातील ‘छोड आये हम’ या गाण्यातून पदार्पण केले होते.” के के हे हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बेंगाली, आसामी आणि गुजराती अशा विविध भाषांमध्ये गात असत.
के के यांचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ ला दिल्लीमध्ये झाला होता. किरोडी मल कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गायन क्षेत्रात पूर्णपणे येण्याआधी ते मार्केटिंग या क्षेत्रात काम करत असत. १९९४ ला त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी लोकप्रिय भारतीय कलाकारांना त्यांच्या आवाजातील डेमो टेप पाठवल्या होत्या, त्यामुळे कमर्शिअल जिंगल गाण्याची संधी त्यांना मिळाली.
१९९९ ला त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप’ हे गाणे गायले होते. त्याच वर्षी त्यांनी त्यांचा पहिला गाण्याचा अल्बम प्रदर्शित केला, त्याचे नाव ‘पल’ असे होते. या अल्बमला मोठी लोकप्रियता मिळाली होती. के के यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३५०० जिंगल ११ भाषांमध्ये गायल्या आहेत. याबरोबरच, ५०० गाणी हिंदीमध्ये गायली आहेत. २०० पेक्षा जास्त इतर भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.
के के यांना सहा फिल्मफेअर पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाले आणि दोन स्क्रीन अवॉर्ड मिळाले आहेत. त्यांनी पार्श्वगायक म्हणून स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. जिथे त्यांचे शेवटचे कॉन्सर्ट होते, तिथे त्यांच्या सन्मानार्थ कोलकातामध्ये त्यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी ३१ मे २०२२ ला त्यांचे निधन झाले.