प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांचं निधन होऊन एक वर्षं उलटलं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. केकेच्या चाहत्यांपासून ते संगीत जगतातील मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
केके यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना एक अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे. कोलकाता येथील ज्या महाविद्यालयात परफॉर्म करताना केकेला हृदयविकाराचा झटका आला त्याच गुरुदास महाविद्यालयात केके यांचा पुतळा उभारण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याच ठिकाणी ‘याद आयेंगे ये पल’ गाण्यावर परफॉर्म करताना केके यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.
आणखी वाचा : चित्रपटविश्वात रचला जाणार नवा इतिहास; OTT वर आलेला मनोज बाजपेयींचा ‘बंदा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार?
या महाविद्यालयाकडून केके यांना ही एक प्रकारची मानवंदनाच देण्यात आली आहे. तिथले स्थानिक समुपदेशक अमल चक्रवर्ती हे ‘एएनआय’शी संवाद साधताना म्हणाले, “केके हे जादूई आवाज असणारं एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होतं. आमच्या महाविद्यालयात त्यांचा हा शेवटचा परफॉर्मन्स ठरला याचं मला वाईट वाटतं.”
लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या केके यांनी त्यात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने केवळ बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली नाही तर इतर भाषांमध्येही गाणी गायली. जिंगल्स गाऊन आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या केकेला ए. आर. रहमानने चित्रपटांमध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला होता.