घारे डोळे, नाजूक पण आकर्षक चेहरा, लांब केस आणि एक गोड स्मितहास्य असं म्हटलं तर प्रत्येकाच्याच समोर ऐश्वर्या रायचा चेहरा येतो. १९९४ मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला आणि सर्वांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. सुष्मिता सेननंतर मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय महिला आहे. मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर अर्थातच ऐश्वर्याने सिनेसृष्टीत तिचं नशीब आजमावायचं ठरवलं. मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून तिला प्रचंड यश आतापर्यंत मिळालं आहे. पण तिचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आज तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील या दुसऱ्या बाजूबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालपण व शिक्षण –

१ नोव्हेंबर १९७३ ला ऐश्वर्याचा झाला एका तुळू भाषिक कुटुंबात कर्नाटकच्या मंगलोरमध्ये झाला. तिचे वडील आर्मी बायोलॉजिस्ट, तर आई गृहिणी. जन्म मंगलोरमध्ये झाला असला तरीही तिचं सगळं शिक्षण मुंबईत झालं. ऐश्वर्या लहान असताना तिचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. मुंबईच्या आर्य विद्यामंदिर हायस्कूलमधून तिने तिचं शालेय शिक्षण घेतलं, नंतर जयहिंद कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतली. एक वर्ष तिथे शिकल्यानंतर ती माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजमध्ये गेली व तिने बारावीमध्ये ९० टक्के गुण मिळवले. मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं असं ऐश्वर्याने आधीपासून अजिबात ठरवलं नव्हतं. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. नंतर तिचा विचार बदलला आणि आर्किटेक्ट होण्यासाठी तिने शिक्षण घेणं सुरू केलं. मुंबईच्या रचना संसद अकॅडमीमध्ये तिने प्रवेश घेतला. पण अखेर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने तिचं आर्किटेक्चरचं शिक्षण अर्धवट सोडलं. तर अभ्यासाव्यतिरिक्त ऐश्वर्या ५ वर्ष नृत्य आणि संगीतही शिकली आहे. १९९१ साली ऐश्वर्याने तिचं मॉडलिंग क्षेत्रातील करिअर सुरू केलं. ती फोर्डने आयोजित केलेली एक इंटरनॅशनल सुपर मॉडेल स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिचा फोटो अमेरिकेतील सुप्रसिद्ध मॅग्झिम ‘वोग’मध्ये आला. त्यानंतर १९९३ मध्ये ती आमिर खानबरोबर पेप्सीच्या जाहिरातीत झळकली.

‘या’ उत्तरामुळे ऐश्वर्या ठरली होती ‘मिस वर्ल्ड’ –

ऐश्वर्याने १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. ‘मिस वर्ल्ड’ होण्यासाठी केवळ सुंदरताच नाही तर कुशाग्र बुद्धिमत्ता व हजरजबाबीपणाही महत्त्वाचा असतो, हे ऐश्वर्याने तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन सिद्ध केलं. ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं विचारपूर्वक उत्तर देऊन ऐश्वर्याने सर्वांचीच मनं जिंकली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला “एखाद्या मिस वर्ल्डमध्ये कोणते गुण असायला हवेत?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत ती म्हणाली होती, “आतापर्यंत आपण जितक्या मिस वर्ल्ड पाहिल्या आहेत त्या सर्वांमध्ये क्षमाभाव हा गुण दिसून आला झाला. केवळ एक विशिष्ट उंची गाठलेल्या लोकांप्रतीच नाही सर्वसामान्यांप्रतीही मिस वर्ल्डच्या मनात क्षमाभाव असला हवा. राष्ट्रीयत्व आणि वर्ण या चौकटींबाहेर जाऊन माणुसकीचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो जी करते तिच व्यक्ती खऱ्या अर्थाने मिस वर्ल्ड होऊ शकते.”

सिनेसृष्टीत पदार्पण –

‘मिस वर्ल्ड’सारखी स्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्याने एक वर्ष लंडनमध्ये राहून एकांताने आयुष्य घालवलं. त्यानंतर ती भारतात आली आणि तिने तिच्या अभिनयाची सुरुवात १९९७ मध्ये मणी रत्नम यांचा तामिळ चित्रपट ‘इरुवर’मधून केली. त्यानंतर तिने ‘पुष्पवल्ली’, ‘कल्पना’ या चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यानंतर तिने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ही अभिनेता म्हणून तिच्या बरोबर बॉबी देओल होता. ऐश्वर्या चा पहिला तमिळ चित्रपट ‘इरुवर’ आणि पहिला बॉलिवूड चित्रपट ‘और प्यार हो गया’ दोन्हीही फ्लॉप ठरले होते. त्यानंतर ती काही दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली. पण त्या चित्रपटांनी फारशी काही चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट ऐश्वर्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि ऐश्वर्या प्रत्येकाच्या परिचयाची झाली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या चित्रपटानंतर ऐश्वर्याच्या करिअरची गाडी वेगाने धावू लागली.

सलमान खानबरोबर अफेअर –

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्याने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. पण त्यांचं हे प्रेम फार काळ टिकलं नाही. शाहरुख खानबरोबर ऐश्वर्याचं अफेअर असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने तिला बराच त्रास दिला. ‘चलते चलते’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत ऐश्वर्या रायला पहिल्यांदा कास्ट करण्यात आलं होतं. मात्र सलमान खानमुळे हा चित्रपट तिच्या हातून गेला होता. ऐश्वर्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना एकदा सलमान खान चित्रपटाच्या सेटवर गेला आणि ऐश्वर्याशी भांडू लागला. सेटवर असलेल्या शाहरुख खानने सलमानला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्याच्याशीही वाद घालू लागला होता. अखेर ऐश्वर्याला या चित्रपटातून बाहेर पडावं लागलं होतं. यानंतरच त्यांच्या नात्यात आणखी दुरावा निर्माण झाला. काही वर्षांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सलमान आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, “सलमान आणि आमच्या ब्रेकअपनंतर मला फोन करुन त्रास द्यायचा. सह कलाकाराशी माझं अफेअर असल्याचा संशय त्याला होता. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत सगळ्यांबरोबर त्याने माझं नाव जोडलं होतं. त्याने मला मारलंही होतं. जर कधी त्याचा फोन मी उचलला नाही तर तो स्वत:ला इजा करुन घ्यायचा. २००१ साली त्याने दारू पिऊन माझ्या घराबाहेर तमाशा केला होता. माझ्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती.”

विवेक ओबेरॉयशी ब्रेकअप –

सलमान खाननंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. दोघांच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली होती. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान असल्याचे म्हटलं गेलं. या ब्रेकअपने विवेकचं संपूर्ण करिअर कसं उद्ध्वस्त केलं, असं त्याने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘अशी’ सुरु झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी –

सलमान खान आणि विवेक ओबेरॉयशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वार्याच्या आयुष्यात ज्युनिअर बच्चनची एंट्री झाली. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिल्यांदा भेट झाली होती. याचवेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. तर त्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ऑबेरॉयचं नाव जोडलं गेलं. पण कालांतराने त्यांचंही ब्रेकअप झालं. त्याच सुमारास अभिषेक बच्चनचंही करिश्मा कपूरशी ठरलेला साखरपूडा मोडला होता. ‘ढाई अक्षर प्रेम के’ च्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये मैत्री झाली होती. तर 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ चित्रपटात ऐश्वर्याने केलेल्या ‘कजरा रे’ डान्सनी अभिषेकला मोहून टाकलं होतं. या गाण्यात अभिषेकही ऐश्वर्याबरोबर नाचताना दिसला. नंतर २००६ मध्ये ‘उमराव जान’ चित्रपटात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे रंग बहरू लागले. टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये अभिषेकने ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी ऐश्वर्याला एक अंगठी देत प्रपोज केलं होतं. त्याचवेळी ऐश्वर्यानेही अभिषेकवर असलेल्या प्रेमाची कबुली देत त्याला लग्नासाठी होकार दिला. ऐश्वर्याचं टॅलेंट, तिचा नम्रपणा, तिची बुद्धिमत्ता यामुळे अमिताभ आणि जया बच्चन यांनाही ती सून म्हणून पसंत होती. अखेर २००७ मध्ये अभिषेक-ऐश्वर्याने लग्नगाठ बांधली.

‘अशी’ आहे बच्चन यांची सून –

ऐश्वर्या सून म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घरी आली आणि तिने प्रत्येक अशी एक खास नातं तयार केलं. बच्चन यांच्या कुटुंबातील सर्वांशीच ऐश्वर्याचं खूप घट्ट नातं आहे. अनेकदा हे संपूर्ण कुटुंबच कार्यक्रमांमध्ये एकत्र सहभागी झालेलं पाहायला मिळतं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनाही त्यांच्या सुनेच्या वागण्याचं खूप कौतुक आहे. एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल्या होत्या, “ऐश्वर्याही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने तिच्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर जगभरात स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मिस वर्ल्ड’ हा मानाचा किताब ती जिंकली आहे. इतकं सगळं यश मिळवूनही ऐश्वर्याला या कशाचाही गर्व नाही. प्रत्येकाला ती आदर देते. आम्ही कुठेही गेलो तरी ऐश्वर्याला मी कधीच पुढे पुढे करताना पाहिलेले नाही. ती नेहमीच आमच्या मागे उभी असते. तिची ही शालीनता मला खूप भावते.” त्याबरोबरच ती प्रत्येक पावलावर अभिषेकला साथ देत आली आहे. अभिषेकच्या कठीण काळातही ऐश्वर्या त्याच्या पाठी खंबीरपणे उभी होती. चित्रपटांच्या शूटिंगमध्ये कितीही बिझी असली तरी ऐश्वर्या तिच्या मुलीला नेहमीच वेळ देताना दिसते. अनेक वेळा ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र कार्यक्रमांमध्ये दिसतात. प्रत्येक ठिकाणी ती तिच्या मुलीला खूप छान पद्धतीने सांभाळून घेते. अशी ही मिस वर्ल्ड ऐश्वर्या एक आदर्श सून, बायको, मुलगी, आई आहे असं म्हणणं काहीच वावगं ठरणार नाही.