Akshay Kumar Birthday special: ९ सप्टेंबर १९६७. अमृतसर मधील एका पंजाबी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं गेलं राजीव हरीओम भाटिया. आज हाच मुलगा बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. हा सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार. एक अभिनेता म्हणून अक्षय कुमार आपल्या सर्वांनाच परिचयाचा आहे. पण अभिनयापलीकडेही जाऊन अक्षय कुमार खऱ्या आयुष्यातही खूप चांगला माणूस आहे. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले पण याचबरोबर त्याचे अनेक चित्रपट अपयशीही ठरले. अनेकदा त्याला टीकेचा सामना करावा लागला. पण कितीही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या, प्रेक्षकांनी चित्रपटांना विरोध केला तरी अक्षयने त्याची माणूसकी कधीही सोडली नाही.
अक्षयचे वडील हरिओम भाटिया आहे आर्मी ऑफिसर. सुरुवातीची काही वर्षं ते दिल्लीला स्थायिक होते, तर त्यानंतर ते मुंबईत राहायला आले. त्याचं सगळं शिक्षण मुंबईत झालं. एका कार्यक्रमामध्ये त्याने स्वतःचा ‘मुंबईकर’ असाही उल्लेख केला होता. अक्षय कुमारला मराठी चांगलं बोलता येतं. याचं कारण म्हणजे त्याची एक गर्लफ्रेंड मराठी होती. अक्षय कुमार लहानपणापासूनच खेळात तरबेज. शिक्षणामध्ये फारसं रस नसल्यामुळे त्याने कॉलेजमध्ये असतानाच त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याला मार्शल आर्टमध्ये प्रचंड रस होतं. ते शिकण्याची त्याची खूप मनापासून इच्छा होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या वडिलांकडे मार्शल आर्टचं रितसर शिक्षण घेण्यासाठी परवानगी मागितली. वडिलांनाही त्याची मार्शल आर्ट शिकण्याची तळमळ कळली. त्यांनी अक्षयला बँकॉकला मार्शल आर्ट शिकण्यासाठी पाठवलं. त्याने तिथे पाच वर्षं मार्शल आर्ट प्रशिक्षण घेतलं आणि त्यात तो तरबेज झाला. तिथे त्याने थाई बॉक्सिंग हा प्रकार शिकला. त्याचा तो काळ हा त्याच्या स्ट्रगलिंगचा काळ होता असंच म्हणावं लागेल. कारण त्याने फक्त तिथे जाऊन मार्शल आर्ट शिकलं नाही तर तो तेथील हॉटेलमध्ये कुक आणि वेटरची कामंही करायचा. त्यानंतर त्याने कोलकत्ता येथे एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं, बांगलादेशची राजधानी असलेलं ढाका येथे त्यांनी शेफ म्हणून काम केलं, तर त्यानंतर दिल्लीला आल्यावर त्याने दागिने विकायचंही काम केलं.
हे सगळं काम करत असताना त्याच्या मनात अभिनयाची आवड ही कायम होती. त्याने आधीच ठरवलं होतं की आपण अभिनय क्षेत्रात करिअर करायचं. थायलंडहून भारतात परतल्यावर त्यानुसार त्याने पावलं उचलायला सुरुवात केली. फक्त त्याला त्याचा पोर्टफोलिओ बनवून मिळावा म्हणून एका फोटोग्राफरकडे त्याने १८ महिने कुठलेही पैसे न घेता असिस्टंट फोटोग्राफर म्हणून काम केलं, अनेक चित्रपटांमध्ये त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. अपार कष्ट घेतल्यानंतर अखेर तो एक दिवस आला जेव्हा त्याला त्याचा पहिला चित्रपट मिळाला.
अक्षय कुमारची लाँगेटिव्हेटी हा मोठा फॅक्टर आहे. १९९१ ते २०२३ अशी जवळपास ३ दशकं तो काम करत आहे. १९९१ साली ‘सौगंध’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीची अनेक वर्ष त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करण्यात अपयशी ठरत होते. पण तरीही त्याने हार मानली नाही. तो काम करतच राहिला. पण यश चोप्रा यांच्या ‘ये दिल्लगी’ या चित्रपटाने अक्षय कुमारचं नशीब पालटलं. या चित्रपटाने त्याला स्टार केलं. यानंतर त्याने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. सुरुवातीला त्याने प्रमुख भूमिका साकारल्या. मग तो कॅरेक्टर रोल करु लागला. त्यानंतर सूत्रधार आणि मुख्य कलाकार अशाही भूमिका तो करु लागला. काळानुरुप चित्रपटांचं मोड्यूल बदलत गेलं आहेत. तसंच अक्षय कुमारनेही स्वत: बदलवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान ही खानमंडळी मोठी झाली त्याकाळात अक्षयने त्याचा स्वतःचा सेपरेट फॅनबेस निर्माण केला. अॅक्शन आणि कॉमेडी हे दोन जॉनर त्याने यशस्वीपणे हाताळलेत. कॉमेडी करणाऱ्या अनेकांना मुख्य प्रवाहात रोल मिळत नाहीत. पण अक्षयने डॅशिंग पोलीस ऑफिसरचीही भूमिका केली. तर दुसरीकडे हेराफेरीत सर्वसामान्य माणूसही केला. यापैकी अनेक भूमिकांसाठी त्याला नामांकित पुरस्कारही मिळाले. नंतरच्या काळात तो टेलिव्हिजनवरही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकला. फिअर फॅक्टरचा तो फेस होता.
काही वर्षं त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व होतं. त्यावरून अक्षयला अनेक टीकांना सामोरं जावं लागलं. तर याचबरोबर काही वर्षांपूर्वी त्याने नरेंद्र मोदी यांचीही मुलाखत घेतली होती. त्यावरूनही तो चांगलाच रोल झाला होता. पण आज तो भारतातला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण आपण सुपरस्टार आहोत हे मनात न आणता आपण या देशाचं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो याची त्याला समज आहे.
अक्षय कुमार हा एक उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण त्याचबरोबर तो एक जबाबदार आणि जागरूक नागरिक आहे. कुठलंही संकट आलं, देशाच्या कुठल्याही भागात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी अक्षय कुमार सर्वात आधी मदतीला धावून जातो. आतापर्यंत अनेक वेळा त्याने त्याच्या परीने शक्य होईल तितकी मदत लोकांना केली आहे. मग तो उत्तराखंडातील पूर असो किंवा करोना महामारी असो; त्याने त्याचं स्टारडम आड न आणता सढळ हाताने गरजूंना मदत केली. त्यामुळे अभिनेता म्हणून तर सर्वजण त्याचं कौतुक करतातच पण एक ‘आपला माणूस’ म्हणून लोक त्याच्याकडे बघतात आणि त्याला आदर्श मानतात.
अभिनय असो किंवा समाजकार्य असो; अक्षय त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत त्याच्या आरोग्याकडे ही तितकंच चांगलं लक्ष देत असतो. तो दैनंदिन जीवनात कोणत्या वेळी कोणती गोष्ट करतो याची अनेकदा चर्चा होते. रात्री लवकर झोपणं, पार्ट्यांना न जाणं, सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं, दिवसातून फक्त आठच तास काम करणं हे अक्षय नेहमीच कटाक्षाने पाळताना दिसतो. विशेष म्हणजे तो अभिमानाने सांगतो की, मी कुठल्याही पार्ट्यांना जात नाही. त्याचं हे विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतात पण हे खरं आहे. अक्षय त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी वेळ काढायला कधी मागे पुढे बघत नाही. तो एक कम्प्लीट फॅमिली पर्सन आहे असं म्हणायलाही काहीच हरकत नाही. अक्षय त्याच्या शूटिंगमधून वेळ काढून त्याच्या कुटुंबीयांना वेळ देतो, त्यांच्याबरोबर फिरायला जातो, कधी कधी घरीच का होईना पण गप्पा गोष्टी करत, काही खेळ खेळत तो त्याची बायको दोन्ही मुलं यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवतो. आज तो देशातला श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असला तरीही त्याच्या दोन्ही मुलांना त्याने कधीही या पैशाचा गर्व वाटू दिलेला नाही. गावाकडचे जेवण कसं असतं हे दाखवण्यासाठी अक्षय स्वतः मध्यंतरी त्याच्या मुलीला मुंबईजवळ एका खेडेगावात घेऊन गेला होता. तेथील लोकांमध्ये तो मिसळला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, चुलीवरचं जेवण तो जेवला. असा हा अभिनेत्यापलीकडचा अक्षय कुमार आहे आपल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणा देणार आहे.