अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. १४ मार्चला प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाची चर्चा होत असताना अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे. अभिनेत्याची एकूण संपत्ती हा चर्चेचा विषय ठरला आहे. जॉन अब्राहमीच एकूण संपत्ती किती? आताची त्याची संपत्ती फक्त चित्रपटांच्या कमाईतून मिळवलेली आहे का, त्याच्या उत्पन्नाची इतर काय साधने आहेत, हे जाणून घेऊ…
जॉन अब्राहमची एकूण संपत्ती ‘इतकी’ कोटी रूपये
‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमची एकूण संपत्ती ही २५१ कोटी इतकी आहे. त्याच्या या संपत्तीत त्याच्या चित्रपटांच्या कमाईबरोबरच त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचादेखील समावेश आहे. जॉन अब्राहमचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस असून, त्याचे नाव जे ए एंटरटेन्मेंट, असे आहे. या प्रॉडक्शनने काही गाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेला यामी गौतम व आयुषमान खुराना यांचा विकी डोनर, २०१३ साली प्रदर्शित झालेला मद्रास कॅफे या सिनेमांची निर्मितीदेखील या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. या चित्रपटात नर्गीस फाखरी व जॉन अब्राहम प्रमुख भूमिकांत दिसले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द डिप्लोमॅट या सिनेमाची निर्मितीदेखील ‘जे ए एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊस’ने केली आहे. ‘मिंट’ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने म्हटले होते की, हे प्रॉडक्शन हाऊस गुंतवणुकीमधील महत्त्वाचे साधन आहे.
त्याबरोबरच जॉन अब्राहमची स्वत:ची फुटबॉल टीम आहे. ही टीम इंडिया सुपर लीगमध्ये भाग घेते. फुटबॉल टीमबरोबरच त्याची एक रेसिंग टीमसुद्धा आहे. गोवा एसेस, असे या टीमचे नाव आहे. जॉन अब्राहमला मोटर स्पोर्ट्समध्ये आवड आहे. त्याबरोबरच जॉन अब्राहमच्या जिमदेखील आहेत. पुणे व मुंबईमध्ये या जिम आहेत. जॉन अब्राहम, निखिल कामथ व गौरी खान यांची मालकी असलेल्या सुबको कॉफी रोस्टर या कंपनीने २०२४ मध्ये जवळजवळ ८७ कोटी रुपये मिळवले. या कंपनीची किंमत २९६ कोटी इतकी आहे. तसेच जॉन अब्राहमने ‘नोटो आइस्क्रीम’मध्येदेखील गुंतवणूक केली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, अभिनेता या कंपनीमध्ये प्रमुख गुंतवणूकदारापैकी एक आहे, ज्याने १५ कोटींची गुंतवणूक केली होती.
दरम्यान, अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेला द डिप्लोमॅट हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३.३० कोटींची कमाई केली होती. आता यापुढे हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘द डिप्लोमॅट’चे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे.