बॉलीवूड अभिनेत्री जरीन खानला एका फसवणुकीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. जरीन कोलकाता न्यायालयात हजर झाली आणि तिला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ती मुंबईहून कोलकात्यात आली आणि सोमवारी कोर्टात हजर झाली. अंतरिम जामीनासोबतच कोलकाता शहरातील न्यायालयाने जरीनला परवानगीशिवाय परदेशात प्रवास न करण्याचे आदेश दिले आहेत. ती न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही.
जरीनने न्यायालयात जाताना चेहरा निळ्या मास्कने झाकलेला होता आणि काळी टोपी घातली होती. आधारकार्डवरून तिची ओळख पटवल्यानंतर सुनावणी पार पडली. जरीन खानच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सियालदह न्यायालयाने अभिनेत्रीला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २६ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच कोलकाता पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता तिला देश सोडून जाता येणार नाही, असेही आदेश दिले.
प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?
नेमकं प्रकरण काय?
२०१८ साली ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिने जवळपास १२ लाख रुपये घेतले होते, पण ती कार्यक्रमांना उपस्थित राहिली नव्हती. कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील काली पूजेच्या ६ कार्यक्रमांना जरीन हजर राहिली नाही. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने नारकेलडांगा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली होती. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात आहे. इतकंच नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, पण नंतर कोर्टाने वॉरंट रद्द केला होता.