कसदार अभिनयशैली आणि दमदार चित्रपटांची निवड यामुळे विशेष चर्चिली जाणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन. ‘पेज ३’, ‘ओमकारा’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटामधून कोंकणाने तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘ए जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून तिने खऱ्या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिने ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.

आज कोंकणा ही उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जातेच. याबरोबरच एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. फिल्ममेकर अपर्णा सेन आणि लेखक पत्रकार मुकुल शर्मा यांच्या पोटी जन्मलेल्या कोंकणाला लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले, पण तिची आई अपर्णा यांनी मात्र कोंकणावर बरीच बंधनं घातली होती. लहानपणी कोंकणाला कमर्शियल हिंदी आणि बंगाली चित्रपट पाहायची मुभा नव्हती. नुकतंच याविषयी कोंकणाने खुलासा केला.

आणखी वाचा : सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यावर का भडकला सनी देओल? व्हिडीओ होतोय व्हायरल

‘फिल्म कंपेनीयन’शी संवाद साधताना कोंकणा म्हणाली, “आम्हाला घरी हिंदी आणि बंगाली चित्रपट पाहायला मुभा नव्हती. तरी मी लपून छपून ‘मिस्टर इंडिया’, ‘मासूम’ असे काही चित्रपट पाहिले. इतकंच नव्हे तर इंग्रजी मालिकाही आम्हाला बघायला मिळत नसे. याबरोबरच माझ्या आईने मला कधीच रामायण किंवा महाभारतही पाहू दिले नाही. या कलाकृती पाहण्याआधी मी ती महाकाव्यं वाचावीत अशी तिची इच्छा होती. दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ती कलाकृती न पाहता ती महाकाव्य स्वतः वाचून आपण आपल्या नजरेतून पहावीत हा यामागे तिचा उद्देश होता, आणि मी तिचं ऐकलं कारण मी खूप आज्ञाधारक होते.”

जीवनाकडे बघायचा एक चौफेर दृष्टिकोन कोंकणाला आईमुळेच मिळाला आणि यामुळेच तिची अभिरुची वाढली असं तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. कोंकणा नुकतीच विशाल भारद्वाज यांच्या ‘कुत्ते’ या चित्रपटात झळकली. शिवाय नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज २’मधील एका शॉर्टफिल्मचं दिग्दर्शनही कोंकणानेच केलं आहे.

Story img Loader