Tisha Kumar Funeral: अभिनेते व निर्माते कृष्ण कुमार यांची दिवंगत मुलगी तिशा कुमार हिचे १८ जुलैला निधन झाले. ती दीर्घकाळापासून कर्करोगाशी लढा देत होती, याच दरम्यान गुरुवारी तिची प्राणज्योत मालवली. २१ वर्षीय तिशा हिच्यावर आज चार दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यसंस्काराचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. तिला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आले होते.
तिशावर रविवारी (२१ जुलै रोजी) अंत्यसंस्कार केले जाणार होणार होते, परंतु मुसळधार पावसामुळे तिचे पार्थिव घेऊन येणारे विमान वेळेत पोहोचू शकले नाही. बरेच लोक तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते पण विमान न आल्याने ते माघारी परतले. अखेर तिशावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले. तिशाला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि बॉलीवूड कलाकार आले होते.
अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचे कर्करोगाने वयाच्या २१ व्या वर्षी निधन
कृष्ण कुमार आणि त्यांची पत्नी तान्या सिंह यांना धीर देण्यासाठी रितेश देशमुख, फराह खान, सई मांजरेकर, साजिद नाडियादवाला, ओम राऊत, सलमानचा बॉडीगार्ड शेरा आले होते.
तिशा ही टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची चुलत बहीण होती. गुलशन कुमार आणि कृष्ण कुमार हे भाऊ आहेत आणि कृष्णा हे टी-सीरीजचे सह-मालक देखील आहेत. तिशाचे भाऊ भूषण कुमार आणि वहिनी दिव्या खोसला कुमारही तिला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. लाडक्या लेकीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कृष्ण कुमार व त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते.
दरम्यान, तिशा लाइमलाइटपासून दूर राहायची, ती शेवटची रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसली होती. यावेळी ती वडील कृष्ण कुमार यांच्याबरोबर आली होती. तिशाचा जन्म ६ सप्टेंबर २००३ रोजी झाला होता. अवघ्या २१ वर्षीय तिशाचे कर्करोगामुळे निधन झाले. तिशा बऱ्याच काळापासून कर्करोगाशी लढा देत होती. आधी तिच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले पण तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला जर्मनीला नेण्यात आलं. तिथेच उपचारादरम्यान तिशाचे निधन झाले.
कृष्ण कुमार यांचे काम
तिशाचे वडील अभिनेते कृष्ण कुमार यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यांच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे ते अभिनय सोडून निर्मितीकडे वळले. १९९५ मध्ये आलेल्या ‘बेवफा सनम’ चित्रपटात कृष्ण कुमार यांनी शिल्पा शिरोडकर, अरुणा इराणी आणि शक्ती कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटातील ‘अच्छा सिला दिया’ हे गाणं खूप गाजलं होतं.