ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. जूनमध्ये रिलीज होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘जानकी’ अर्थात रामायणातील सीतेची भूमिका साकारत आहे.
‘रामायणातील सीता’ ही महत्त्वाची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होते. सीतामातेच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ‘आदिपुरुष’मध्ये एवढी महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत सहसा अशा चांगल्या, प्रभावशाली भूमिका मिळत नाहीत.”
हेही वाचा : वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर तिच्या नियोजित पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”
‘आदिपुरुष’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरनंतर काही दिवसांत चित्रपटाचे पहिले गाणे ‘जय श्री राम’ रिलीज झाले. या गाण्याने २४ तासांमध्ये यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्याचा विक्रमही केला. तसेच या चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे दुसरे गाणे २९ मे रोजी प्रदर्शित होणार असून या गाण्याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, जानकी म्हणजेच सीतामातेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग दिसणार आहेत. कृष्ण कुमार, राजेश नायर, भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि ओम राऊत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.