ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. सुरुवातीला या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अत्यंत उत्सुकता होती. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची निराशा झाली. या चित्रपटातील दृश्यांवरून या चित्रपटाला ट्रोल करण्यात आले. तर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही बदलली गेल्याचे टीम कडून सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल आणि या चित्रपटाबद्दल आता तिने भाष्य केलं आहे.
अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने ‘नवभारत टाइम्स’ला नुकतीच एक मुलाखत दिली. यात तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. ती पहिल्या दिवसापासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे श्रेय तिने या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला दिलं.
क्रिती म्हणाली, “पहिल्या दिवसापासून या चित्रपटाबद्दल माझ्या मनात अत्यंत उत्सुकता होती. अशी भूमिका कलाकाराच्या वाट्याला पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. या चित्रपटाचे जेव्हा मला विचारणा करण्यात आली तेव्हापासून मी या चित्रपटासाठी उत्सुक होते. त्यावेळी माझ्याकडे या चित्रपटाच्या शूटिंगला देण्यासाठी डेट्सही नव्हत्या. पण मी माझं इतर काम सांभाळून या चित्रपटाचं चित्रीकरण करेन असं ओमला सांगितलं. कारण मला ही संधी सोडायची नव्हती.”
पुढे क्रिती म्हणाली, “ही भूमिका साकारणं माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. भूमिका साकारणारा माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती. या व्यक्तिरेखाला एक वजन असल्यामुळे ही करणं माझ्यासाठी खरोखर कठीण होतं. परंतु आमचे दिग्दर्शक ओम राऊत यांची मला खूप मदत झाली. या पौराणिक व्यक्तिरेखांबद्दल त्यांना वाटणारा आदर आणि यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन यामुळे माझं काम खूप सोपं झालं. जेव्हा तुम्ही एखादी काल्पनिक भूमिका करता तेव्हा कलाकार म्हणून त्या भूमिकेबद्दल तुम्ही काही निर्णय घेऊ शकता. परंतु ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू शकत नाही. तुम्हाला एका चौकटीच्या आत राहूनच काम करावं लागतं. मला आशा आहे की माझी ही भूमिका आणि आमचा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.”
‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. आधी हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ६ महिने पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका अभिनेता प्रभास, सीतेची भूमिका क्रिती तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. तसेच ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये भगवान हनुमान यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.