अभिनेता कमाल आर खान म्हणजेच (केआरके) हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला केआरके ट्वीटद्वारे बॉलिवूड तसेच हिंदी चित्रपटांबाबत भाष्य करताना दिसतो. त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे आणि त्याला तुरुंगात पण जावं लागलंय. पण तरीही तो सोशल मीडियावरून व्यक्त होत बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटिंना लक्ष्य करत असतो. यावेळी त्याने महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांचा उल्लेख करत एक ट्वीट केलंय.
अमिताभ बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भाष्य केलं होतं. त्याचा उल्लेख करत केआरके म्हणाला, “अमिताभ बच्चन सरांनी म्हटलंय की नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही बंधनं लादली जाऊ नये. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावू नये. मग संपूर्ण बॉलिवूड माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणण्यासाठी मला मारायचा प्रयत्न का करतंय? सलमान खान, वाशू भगनानी हे निर्माते माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखण्यासाठी न्यायालयात का गेले?” असा सवाल केआरकेने उपस्थित केला आहे.

केआरके इथेच थांबला नाही. त्याने पुढे लिहिलं, “तुम्ही सर्व तथाकथित सुपरस्टार एका चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये घेता आणि नंतर समीक्षकांच्या रिव्ह्यूला घाबरता. त्यामुळे तुमचे बकवास चित्रपट सुपरहिट करण्यासाठी तुम्हाला त्याला मारायचं आहे. म्हणूनच माझ्यासाठी तुम्ही सुपरस्टार नाहीत, तुमच्या अशा दयनीय जीवनावर थू आहे,” असंही तो म्हणाला.

“जर मला धमकावलं जात असेल तर सुशांत सिंह राजपुतालाही धमकी दिली गेली असेल. जर मला मारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सुशांतलाही मारलं गेलं असावं,” असा दावाही केआरकेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल केला आहे.

यापूर्वी आणखी दोन ट्विटमध्ये केआरकेने मोठा दावा केला होता. “माझ्या वकिलांनी सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन जगाला सांगेन की माझ्या नावाची सुपारी कोणी दिली आहे आणि तुरुंगात मला मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता. एका अभिनेता + एक राजकारणी + एका पोलीस अधिकाऱ्याने तो कट रचला होता,” असं केआरकेचं म्हणणं आहे.

केआरके सातत्याने ट्वीट करत नवनवीन आरोप करतोय. त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं की, “मला रिव्ह्यू करण्यापासून रोखणे ही एक गोष्ट आहे. पण मला मारण्यासाठी कट देखील रचला जात आहे. त्यांनी मला मारण्याचा कट रचला, याचा अर्थ ते माझ्या रिव्ह्यूला घाबरले आहेत. मी नशिबवान आहे की मी आज जिवंत आहे. आजही एक पोलीस अधिकारी मला एन्काउंटर करण्याची धमकी देत आहे आणि पण त्याला मी घाबरत नाही,” असा आरोपही त्याने केला.

मुंबई पोलिसांनी कमाल आर खानला २९ ऑगस्ट रोजी विमानतळावरून अटक केली होती. २०२०मध्ये केलेल्या दोन ट्वीटमुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्याने दोन वर्षांपूर्वीच्या ट्वीटमध्ये दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्यासाठी अपमानास्पद शब्द लिहिले होते. त्यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.