गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. रविवारी(२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झालं. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली. या संपूर्ण प्रकारानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
दिल्लीत कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बॉक्सर विजेंदर सिंगने ट्वीट केलं आहे. विजेंदरने साक्षी मलिकचा एक फोटो शेअर करत या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. “आज माझी वेळ आहे उद्या तुझी येईल…सगळ्यांचा नंबर लागणार,” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> Wrestler Protest : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही साक्षी मलिकचा ठाम निर्धार, म्हणाली, “सुटून आल्यानंतर…”
विजेंदर सिंगचं हे ट्वीट बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमल आर खान(केआरके)ने रिट्वीट केलं आहे. केआरके सोशल मीडियावरुन अनेक गोष्टींबद्दल त्याचं मत व्यक्त करत असतो. रिट्वीट केलेल्या ट्वीटमध्ये केआरकेने “एकदम बरोबर बोललात तुम्ही,” असं म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. नव्या संसद भवनाच्या बाहेर कुस्तीपटूंनी ‘महापंचायत’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.