अलीकडेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती दोन्ही मुलांसह गेटच्या बाहेर रस्त्यावर उभी होती. त्यामध्ये ती म्हणत होती की नवाजुद्दीनने रात्री उशिरा तिला घरातून बाहेर काढलं होतं. त्या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा घाबरलेला दिसत होता, तर तिची मुलगी गेटकडे पाहून रडत होती. यावर अभिनेता व चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने प्रतिक्रिया दिली आहे.
“जर तुझी मुलं रस्त्यावर रात्र घालवत असतील आणि तू तुझ्या बंगल्यात छान झोपत असशील तर तू अमानुष आहेस. तू मानवजातीवर कलंक आहेस. एक चांगला माणूस आणि एक चांगला पिता आपल्या मुलांसाठी जीवही देऊ शकतो, मी माझ्या मुलांना चांगलं जीवन देण्यासाठी माझे अवयव विकू शकतो,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हे आहे नवाजुद्दीन सिद्दीकीचे सत्य, त्याने स्वतःच्या निष्पाप मुलांनाही सोडलं नाही. ४० दिवस घरात राहिल्यानंतर मी बाहेर पडले होते, कारण वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला तातडीने बोलावलं होतं, पण जेव्हा मी घरी परतले तेव्हा मला माझ्या मुलांसह आत येऊ देऊ नये म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीने गार्ड्स नेमले होते. मला आणि माझ्या मुलांना या माणसाने क्रूरपणे रस्त्यावर सोडून दिलं,” असा आरोप आलिया सिद्दीकीने व्हिडीओ शेअर करत केला होता.
आलिया सिद्दीकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचंही तिने म्हटलं आहे.