सलमान खानचा तगडी स्टारकास्ट असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा फक्त एक दिवस बाकी आहे. सलमान खानसह इतर कलाकारही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत, अशातच अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खानने सलमान खानचा चित्रपट चालणार नसल्याचं भाकित केलंय. शिवाय त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांवरही टीका केली आहे.
Video: आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; रडत म्हणाली, “मला काहीही झाल्यास…”
केआरके ट्वीट करत म्हणाला, “माझ्या सूत्रांनुसार, उद्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा निर्माता त्याची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी स्वतःच २० कोटी रुपयांची तिकिटं खरेदी करेल. पण सत्य हेच आहे की बुडणाऱ्याला कोणीच वाचवू शकत नाही. जनता त्याला रस्त्यावर आणेल आणि त्याला त्याची लायकी दाखवेल.” केआरकेने या ट्वीटमधून नाव न घेता सलमान खानवर टीका केली आहे.
याशिवाय त्याने एक पोलही घेतला होता, ज्यामध्ये किती लोक हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत, अशी विचारणा त्याने केली होती. ४३ टक्के लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हा चित्रपट पहिल्या दिवशी फक्त ९ ते १० कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाजही केआरकेने वर्तवला होता.
दरम्यान, केआरकेने सलमान खानवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्याने सलमानच्या उंचीची खिल्ली उडवली होती.