IPL 2023 Final : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना सोमवारी(२९ मे) गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतदार सामना सुरू असतानाच पाऊस आल्याने मॅच मध्येच थांबवावी लागली. पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडं करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले.
आयपीएलच्या अंतिम सामन्यातील काही फोटो बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमाल आर खानने(केआरके) ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. “बीसीसीआय ही डिजिटल भारतातील श्रीमंत संस्थांपैकी एक आहे. अमृतकालमधून हजारो कोटींचा खर्च करुन बीसीसीआयने अहमदाबादमध्ये सर्वौत्तम असणाऱ्या स्टेडियमपैकी एक असे स्टेडियम बनवले. आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये पाऊस पडला आणि मैदान कोरडं करण्यासाठी स्टाफकडून प्रयत्न केले गेले. इतर देशात मैदान कोरडे करण्यासाठी मशिनचा वापर केला जातो,” असं ट्वीट त्याने केलं आहे.
केआरकेने आयपीएलच्या अंतिम सामन्यातील फोटो शेअर करत केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
आयपीएलचा अंतिम सामना रविवारी(२८ मे) पार पडणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजेच २९ मेला खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत रोमहर्षक विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.