कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. कृष्णाची बहीण अभिनेत्री आरती सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आरती तिचा प्रियकर दीपक चौहानबरोबर लग्न करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. येत्या एप्रिल महिन्यात दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
कृष्णाच्या घरी बहिणीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांना या लग्नसोहळ्याची पत्रिका पाठवण्यात येणार आहे. मात्र, कृष्णा त्याचा मामा गोविंदा यांना या लग्नाची पत्रिका देणार का, याबाबत अनेकांना उत्सुक्ता लागली आहे. आता खुद्द कृष्णाने यावर मौन सोडत बहिणीच्या लग्नात मामा गोविंदा सहभागी होणार की नाही याबाबत खुलासा केला आहे.
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद जगजाहीर आहे. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये टोकाचे वाद झाले होते. रागाच्या भरात दोघांनीही एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केली होती. या वादानंतर कृष्णा आता आपल्या बहिणीच्या लग्नात गोविंदाला बोलवणार का? असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. यावर कृष्णानेच स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, “गोविंदा माझे मामा आहेत, त्यामुळे माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका सगळ्यात पहिल्यांदा त्यांनाच दिली जाणार. आमच्यात काही मतभेद झाले होते तो वेगळा मुद्दा आहे, पण या लग्नाची पत्रिका सगळ्यात अगोदर त्यांनाच मिळेल.”
हेही वाचा- प्रसिद्ध कार डिझायनरने कपिल शर्माला घातला पाच कोटींचा गंडा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णाने मामा गोविंदा यांच्याबरोबर झालेल्या वादावर भाष्य केले होते. एवढंच नाही तर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने गोविंदाबरोबरचे वाद मिटवण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच गोविंदा माझे प्रेरणास्थान असल्याचेही कृष्णा म्हणाला होता.