प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण केलेल्या कृष्णाने अनके कार्यक्रमांचं सूत्रसंचालन व चित्रपटांतही काम केलं आहे. गोविंदा व कृष्णा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. कृष्णाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कौटुंबिक वादावर भाष्य केलं.
गोविंदा व त्याची पत्नी सुनिता यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णावर नाराजी व्यक्त केली होती. कृष्णा व बहीण आरती सिंह या दोघांनीही कठीण काळात आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना मामा गोविंदाने आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं. दर महिन्याला त्यांच्याकडून दोन हजार रुपये मिळायचे, असं कृष्णा म्हणाला होता. याबाबत प्रश्न विचारताच गोविंदाने यावर भाष्य करणं टाळलं होतं. परंतु, सुनिता यांनी नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “मला आता पश्चाताप होतोय की मी त्यांची इतकी काळजी का घेतली होती,” असं त्या म्हणाल्या होत्या.
मामीच्या या वक्तव्यावर आता कृष्णाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णाने एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. कृष्णा म्हणाला, “आम्ही एक कुटुंब आहोत. आणि मी मामवर खूप प्रेम करतो. पण, माझे मामा व मामी माझ्यावर रागावले असतील, तर ते त्यांचं प्रेम आहे. त्यामुळे अशा वादाकडे मी लक्ष देत नाही. आणि जर मी नाराज होऊन कोणतं वक्तव्य केलं, तर तेही त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमामुळेच. हा आमचा कौटुंबीक वाद आणि आमच्यातील प्रेम आहे.”
नेमका वाद काय?
कृष्णा व बहीण आरती सिंह या दोघांनीही कठीण काळात आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना मामा गोविंदाने आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दर महिन्याला त्यांच्याकडून दोन हजार रुपये मिळायचे, असं म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता सुनिता संतापून म्हणाल्या, “कोणताही फालतू प्रश्न विचारू नका. गोविंदाला उत्तर द्यायचं असेल तर त्याने द्यावं, पण मी देणार नाही. कारण त्या दोघांनी तुमच्या मुलाखतीत जे काही सांगितलं ते खरं नाही. त्यामुळे माझी चिडचिड होत आहे. गोविंदाही त्यांना कधीच काही बोलत नाही. मला आता पश्चाताप होतोय की मी त्यांची इतकी काळजी का घेतली होती.”