अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रविवारी (२३ जून) आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर थाटामाटात रिसेप्शनही पार पडले. यावेळी सोनाक्षीच्या लाल रंगाच्या साडीने लक्ष वेधून घेतले होते. या रिसेप्शनला रेखापासून सलमान खानपर्यंत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे आपल्या लेकीच्या लग्नात मोठ्या आनंदात दिसत होते. मात्र, आता सोनाक्षीच्या भावांची चर्चा रंगली आहे. लव सिन्हा व कुश सिन्हा हे दोघे आपल्या बहिणीच्या आंतरधर्मीय लग्न करण्याच्या निर्णयावर नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी लग्नाला हजेरी लावली नाही, अशा प्रकारे बोलले जात होते. आता त्यावर कुश सिन्हा याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘न्यूज १८’बरोबर संवाद साधताना कुश सिन्हाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तो म्हणतो, “अनेक जण खोट्या अफवा पसरवत आहेत आणि लोक अशा प्रकारचे कृत्य का करीत आहेत माहीत नाही. मला फार प्रसिद्धी आवडत नाही आणि त्यामुळे मी फोटोत दिसलो नाही. याचा अर्थ मी तिथे नव्हतो, असा होत नाही. मी तिच्या लग्नात आणि रिसेप्शनला हजर होतो. माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम तिच्याबरोबर आहेत. हा काळ आमच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत भावनिक आहे”, अशा प्रकारचे वक्तव्य करीत कुशने आपण सोनाक्षीच्या लग्नात नसल्याचे वृत्त फेटाळले आहे.
लग्नात सोनाक्षीचा जवळचा मित्र अभिनेता साकिब सलीमने तिच्या लग्नात भावाची जबाबदारी पार पाडल्याने लव सिन्हा व कुश सिन्हा या लग्नात हजर नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा : सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’! वाढदिवसानिमित्त दिली आनंदाची बातमी, सुरू केला ‘हा’ व्यवसाय

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी जेव्हा लग्न करण्याची घोषणा केली त्यावेळी विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. सोनाक्षीच्या घरावर मोर्चेदेखील काढले होते. त्यावर ‘टाइम्स नाऊ’बरोबर संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोध करणाऱ्यांना आणि लव्ह जिहादचे नाव देणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. ते म्हणतात, “माझ्या मुलीने बेकायदा आणि असंविधानिक असे काहीच केलेले नाही. ज्यांना काही काम नाही, तेच लोक दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलतात, टीकाटिप्पणी करतात. लग्न ही दोन व्यक्तींमधील अत्यंत खासगी गोष्ट आहे. त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा किंवा टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जे सोनाक्षीच्या लग्नाला विरोध करीत आहेत, त्यांना मला सांगायचे आहे की, जा आणि स्वत:च्या आयुष्याला उपयुक्त असे काही काम करा. त्यापेक्षा मला अधिक काही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kussh sinha responds to rumours about absent in sonakshi sinha and zaheer iqbal wedding nsp