अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या वर्षी ११ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर एकत्र थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणण्यास अपयशी ठरले. दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांनी हे चित्रपट चित्रपटगृहात पाहिले नाहीत आणि दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक असलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटावर जोरदार टीका झाली. तर दुसरीकडे अक्षयचा चित्रपट कौटुंबिक असूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालू शकला नाही. आता दोन्ही चित्रपट ओटीटीवर परत प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटगृहानंतर आता ओटीटीवर या चित्रपटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीमुळे सेटवरच रडू लागली रश्मिका मंदाना, म्हणाली, “मी तुझ्याइतकी…”

झी5 वर ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’च्या आधी दाखल झाला. झी5 ने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचा जोरदार प्रचार केला. तर त्यानंतर काहीच दिवसात नेटफ्लिक्सवर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज केला गेला. आमिरने रिलीजपूर्वी सांगितले होते की, तो चित्रपट सहा महिने ओटीटीवर आणणार नाही. परंतु त्या आधीच हा चित्रपट ओटीटी आल्याने आता सहा महिने पूर्ण झालेत का, असा सवाल प्रेक्षक करत आहेत.

रिलीजनंतरचे वातावरण आणि आकडेवारी पाहता, ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा खूपच कमी बजेट असूनही रक्षाबंधन या शर्यतीत पुढे आहे. नेटफ्लिक्सवर ‘लाल सिंग चड्ढा’ पाहण्यापेक्षा प्रेक्षक झी5 वर ‘रक्षाबंधन’ बघण्याला प्राधान्य देत आहेत. अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे प्रमोशन करण्यासाठी काही व्हिडिओ पोस्ट केले होते. तसेच झी5 देखील या चित्रपटाबद्दल सतत अपडेट्स दिले. परंतु आमिर खान यापैकी काहीही करताना दिसला नाही.

हेही वाचा : आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

झी5 ने ‘रक्षाबंधन’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख आधीच घोषित करून त्यानुसार ‘रक्षाबंधन’ ओटीटीवर रिलीज केला. तर दुसरीकडे नेटफ्लिक्सने कोणतीही कल्पना न देता ठरलेल्या तारखेच्या आधीच ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज केला. यामुळे सोशल मीडिया आणि प्रेक्षकांना एकच संदेश गेला की, आमिरच्या चित्रपटाला मल्टिप्लेक्सप्रमाणे इथे प्रेक्षक मिळणार नाहीत हे नेटफ्लिक्सने मान्य केले आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नसला तरी ओटीटी रिलीजबाबत नेटफ्लिक्सने किमान लोकांना कल्पना द्यायला हवी होती. त्यामुळे निर्माते आणि नेटफ्लिक्सच्या अशा वागण्यामुळे प्रेक्षक ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा ‘रक्षाबंधन’ बघण्याला प्राधान्य देत आहेत.