रेश्मा राईकवार
गोष्ट नुसती उत्तम असून भागत नाही, ती रंजकपणे सांगता यायला हवी. चित्रपटाच्या भाषेत सांगायची तर त्याचा पैस अधिक व्यापक होत जातो. पण म्हणून ती बोजड होणं गरजेचं नाही. तुमच्या आमच्या बाबतीत घडलेली साधीच गोष्टही जेव्हा मनाला स्पर्शून जाते, तुमचं तुम्हाला म्हणून वेगळं काही देऊन जाते तेव्हा तो अनुभव शब्दातीत असतो. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा असाच भन्नाट अनुभव देणारा चित्रपट आहे. एकाच वेळी तो निरागस आहे, शहाणीव देणारा आहे, अलगद प्रेम टिपणारा आहे, समाज-कुटुंब, प्रशासन अशा सगळ्या व्यवस्थेतील उणिवांच्या या फसव्या जगातही सगळंच काही खोटं नाही म्हणून नकळत चेहऱ्यावर समाधान देऊन जाणारा आहे.
‘लापता लेडीज’ ही बिप्लब गोस्वामी यांची मूळ कथा खरोखरच भन्नाट आहे. या पुरस्कार विजेत्या कथेला स्वतंत्र प्रतिभेच्या किरण रावसारख्या दिग्दर्शिकेने एक वेगळा दृष्टिकोन देत केलेला हा चित्रपट नितांतसुंदर अनुभव देऊन जातो. एकाच दिवशी लग्नाचे मुहूर्त असल्याने काही नवविवाहित जोडपी एकाच एक्स्प्रेसमधून आपापल्या गावी परतत असतात. लाल साडी आणि डोक्यावरचं भलंमोठं घुंघट ओढून बसलेल्यांपैकी आपली कोणती? हे कळणं अवघडच. तीच गोष्ट एकाच रंगाचे ब्लेझर सूट घालून फिरणाऱ्यांमध्ये आपला कोणता? हे संपूर्ण चेहरा झाकलेल्या पदरातून दिसणार कसं? तर या गोंधळात दीपक कुमार आपल्या नववधूला फुल कुमारीला घेऊन आपल्या गावी परततो आहे. मिळेल ते वाहन, दोन दोन ट्रेन बदलून कराव्या लागणाऱ्या या प्रवासात रात्रीच्या अंधारात आपल्या स्टेशनवर उतरताना दीपक फुलऐवजी दुसऱ्याच कोणाच्या तरी नववधूचा हात पकडून उतरतो. अगदी घरी येऊन ओवाळणीसाठी तिच्या डोक्यावरचा पदर दूर करेपर्यंत या गोंधळाचा पत्ताच कोणाला नसतो. फुल नेमकी कुठे हरवली? तिला शोधायचं कसं? हा दीपकसमोरचा प्रश्न. तर नवऱ्याचं नावही न घेता येणाऱ्या फुलला तिच्या सासरच्या गावाचं नावही आठवत नाही आहे. दीपकचा हात धरून केवळ पायाखालची जमीन धुंडाळत केलेल्या या भल्यामोठ्या प्रवासात आपण कुठून चढलो हेही फुलला माहिती नाही. त्यामुळे तिला घरी पाठवायचं कसं? हा प्रश्न स्टेशन मास्तरला पडला आहे. फुलच्या जागी दीपकच्या घरी पोहोचलेल्या दुसऱ्या लेडीजची कहाणीही रंजक. अखेर हा गोंधळाचा तिढा कसा सुटतो? याची रंजक कथा ‘लापता लेडीज’मध्ये पाहायला मिळते.
हेही वाचा >>> ही अनोखी गाठ सोपी सुटसुटीत… !
हरवलेल्या बायकांची ही गोष्ट ऐकून वरकरणी रंजक वाटली तरी काळजाचा ठोका चुकवायला लावणारी आहे. समजून घ्यायला हव्यात अशा, विचार कराव्यात अशा कितीतरी गोष्टी यात आहेत. आणि त्या मांडताना दिग्दर्शक किरण रावची नजर कुठेही चुकलेली नाही. मुळात वास्तवदर्शी शैलीतील चित्रपट आणि चित्रण हे किरण राव यांचं वैशिष्ट्य. ‘लापता लेडीज’ही त्याला अपवाद नाही. साधेपणातलं सौंदर्य शोधण्याची किरण राव यांची दृष्टी आणि ती इतरांपर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचं दिग्दर्शकीय कसब या दोन्ही गोष्टींची प्रचीती चित्रपटात ठायी ठायी येते. किरण राव यांनी ‘पानी’ फाऊंडेशनच्या माध्यमातून गावखेड्यात काम केलं आहे. गावात राहिल्या आहेत, लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे गाव मग ते महाराष्ट्रातलं असो वा देशातल्या कुठल्याही प्रांतातील असो… तिथली म्हणून एक वेगळीच संस्कृती असते, घरातलं वातावरण, घरच्या लोकांची एकमेकांशी बोलण्याची पद्धत, बायकांच्या चालण्या-बोलण्यातील लकब अशा बारीकसारीक गोष्टी या चित्रपटात खूप सुंदर पद्धतीने टिपल्या आहेत. वर म्हटलं तसं या एकाच गोष्टीतून कितीतरी विषय पोहोचवण्याचं काम किरण राव यांनी केलं आहे. लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणजे शिक्षण नसलं तरी चालेल पण घरकाम, शिवणकाम, स्वयंपाक, अंगमेहनत सगळ्यासाठी चोख तयार केलेल्या या मुली. लग्नानंतर नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही याची इतकी दहशत की संकटात सापडल्यावरही सुटकेचा भाग म्हणूनही ते ओठावर आणण्यासाठी त्या कचरतात. आपला नवरा पुन्हा भेटेल की नाही याची शाश्वती नाही, पण माहेरी गेलो तर त्यांची नाचक्की होईल म्हणून तिथे परतण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला जातो. स्त्रीला किती गृहीत धरलं जातं, लहानपणापासून त्यांना काय पद्धतीनं घडवलं जातं याकडे दिग्दर्शिकेने सहज लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा >>> ‘हे वर्ष चित्रपटांचं…’
या सगळ्याच गोंधळाच्या मुळाशी स्त्री-पुरुष दोघांचंही असणारं अज्ञान, अंधानुकरण करत ठेविले अनंते या वृत्तीने होणारी वाटचाल या उणिवांकडे जसं आपलं लक्ष वेधलं जातं. तितक्याच निखळपणे एका स्त्रीची दुसरीला समजून घेण्याची वृत्ती ही सहजतेने दिसते. नवरा मुंबईत नोकरीला असल्याने एकाकी पडलेल्या सुनेचा उत्साहच हरवला आहे, तिला तिच्या वयाचं कोणीतरी हवं याची जाणीव असणारी सासू दुसरी सून मैत्रीपूर्ण वागणारी असावी यासाठी प्रार्थनाही करते आणि आपण असं मैत्रिणीसारखं वागू शकतो का? असं गमतीगमतीत आपल्या सासूलाही विचारते. अतिशय निखळ, निरागस अशी नाती, गावातलं भावविश्व हे सगळं टिपणाऱ्या विकाश नवलखा यांच्या कॅमेऱ्यातून ती काहीशी उन्हाने रखरखलेली, अंधारात दडलेली गावंही सुंदर भासतात. सगळ्या नव्या कलाकारांची निवड केली असल्याने एकप्रकारचा ताजेपणा या चित्रपटाला आहे. स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि प्रतिभा रांता या तिन्ही मुख्य कलाकारांनी नवखे असूनही उत्तम अभिनय केला आहे. त्यांच्या दिसण्यापासून असण्यापर्यंत ते त्या व्यक्तिरेखा जगले आहेत जणू… या नव्या कलाकारांना छाया कदम आणि रवी किशन यांच्यासारख्या तगड्या, अनुभवी कलाकारांची साथ लाभली आहे. चित्रपटात मध्ये मध्ये न करताही सहज येणाऱ्या गाण्यांनी या चित्रपटाचा गोडवा अधिक वाढवला आहे. एक उत्तम आशय आणि दर्जेदार मांडणी असलेला ‘लापता लेडीज’ हा चुकवू नये असा भन्नाट चित्रपट आहे.
दिग्दर्शक – किरण राव कलाकार – स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, प्रतिभा रांता, छाया कदम, रवी किशन