किरण रावच्या ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तशी फार चांगली कामगिरी करु शकला नाही. पण हा चित्रपट ओटीटीवर येताच अनेकांनी त्याचं कौतुक केलं. शिवाय समीक्षकांनीही चित्रपटाबद्दल स्तुती केली होती. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना क्षणभर हसवलं तर रडवलंही. या चित्रपटाला आणि त्यामधील कलाकारांना बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. एवढंच नव्हे तर ‘लापता लेडीज’ चित्रपट ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही पाठवण्यात आला होता.

असा सर्व स्तरातून कौतुक झालेला किरण रावचा ‘लापता लेडीज’ एका विदेशी चित्रपटाची कॉपी असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत आहेत. ‘लापता लेडीज’ हा ‘बुर्खा सिटी’ (Burkha City) नावाच्या विदेशी चित्रपटाची कॉपी असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. याबद्दल आता ‘बुर्खा सिटी’चे दिग्दर्शक फॅब्रिस यांनी त्यांना धक्का बसल्याचे आणि दु:ख झाल्याचे म्हटलं आहे. एवढेच नाही तर त्यांनी असेही म्हटले की, ते ‘लापता लेडीज’च्या निर्मात्यांशी याबद्दल बोलू इच्छितात.

फॅब्रिस ब्रॅक यांनी आयएफपीला सांगितले की, “लापता लेडीज चित्रपटाची कथा माझ्या चित्रपटाच्या कथेशी मिळती जुळती आहे. त्यात एक दयाळू, प्रेमळ, निष्पाप नवरा आहे. एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. शिवाय पोस्टरमध्येही साम्य आहे. चित्रपटाच्या शेवटी असलेल्या कथानकाच्या वळणात एक साम्य आहे. जिथे आपल्याला कळते की, एका महिलेने जाणूनबुजून तिच्या पतीपासून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मी माझा लघुपट २०१७ मध्ये लिहिला होता आणि २०१९ मध्ये अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला होता.”

'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक फॅब्रिस ब्रॅक
‘बुर्का सिटी’चा दिग्दर्शक फॅब्रिस ब्रॅक

‘लापता लेडीज’ पाहिल्यानंतर फॅब्रिस ब्रेक यांना कसे वाटले? असे विचारले असता ते म्हणाले की, “जेव्हा मला हे कळले तेव्हा मला धक्का बसला आणि दुःखही झाले. विशेषतः जेव्हा मला कळले की, या चित्रपटाला भारतात प्रचंड यश मिळाले आहे आणि ऑस्करसाठीही त्याची निवड झाली आहे. मी ‘बुर्खा सिटी’ हा चित्रपट एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनवता येईल असा विचार करत होतो. पण आता ते शक्य आहे का? मला ‘लापता लेडीज’च्या निर्मात्यांशी बोलायचे आहे.”

‘बुर्खा सिटी’च्या दिग्दर्शकांच्या या वक्तव्यावर आता ‘लापता लेडीज’चे लेखक बिप्लब गोस्वामी यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “२०१४ मध्ये पटकथा लेखक संघटनेकडे ‘लापता लेडीज’ आणि २०१८ मध्ये ‘टू ब्राइड्स’ नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण पटकथा नोंदणीकृत केली होती. सारांशातही एका दृश्याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे की, वर चुकीच्या वधूला घरी आणतो आणि डोक्यावरील पदरमुळे त्याला त्याची चूक लक्षात येते. यामुळे त्याला कुटुंबीयांना धक्का बसतो. येथूनच कथेला सुरुवात होते.”

शिवाय त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, “हे आरोप केवळ लेखक म्हणून माझ्या प्रयत्नांना कमी लेखत नाहीत, तर संपूर्ण चित्रपट निर्मिती टीमच्या कठोर परिश्रमांनाही कमी लेखतात. चित्रपटाची संकल्पना, पात्रे आणि संवाद यावर अनेक वर्षांपासून काम सुरू होते. ३ जुलै २०१४ रोजी ‘टू ब्राइड्स’ या शीर्षकाने त्याची अधिकृत नोंदणी झाली. चित्रपटातील विनोद, ट्विस्ट, चेहरा झाकल्यामुळे वराने नकळत चुकीच्या वधूला घरी आणणे, हे सर्व ‘बुर्का सिटी’ प्रदर्शित होण्यापूर्वी सादर केलेल्या सारांश आणि पटकथेचा भाग होते.”