आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘लगान’ चित्रपट तुम्हाला आठवतोय का? क्रिकेटवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘लगान’ रिलीज होऊन २३ वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. या चित्रपटात आमिरबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून ग्रेसी सिंहने (Gracy Singh) काम केलं होतं. ग्रेसीने मोजकचे चित्रपट केले आणि ती अभिनयापासून दूर गेली, पण आता ती कशी दिसते याची उत्सुकता बऱ्याच चाहत्यांना आहे.
‘लगान’ १५ जून २००१ रोजी रिलीज झाला होता. २३ वर्षांत या चित्रपटातील कलाकारांमध्ये बरेच बदल झाले आहेत. ते तेव्हाच्या तुलनेत आता खूप वेगळे दिसतात. या चित्रपटात आमिर खानसोबत ब्रिटिश अभिनेत्री रेचेल शेली हिने काम केलं होतं, त्याचबरोबर ग्रेसीने यात गौरी नावाचे पात्र साकारले होते. या २३ वर्षांत ग्रेसी खूप बदलली आहे.
आमिर खानच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात निरागस गौरीची भूमिका करणारी ग्रेसी सिंह आता ४३ वर्षांची झाली आहे. २३ वर्षांनंतर या अभिनेत्रीला पाहून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिच्या दिसण्यात बदल झाला असली तरी ती सुंदर दिसत आहे. ‘लगान’ व्यतिरिक्त, ग्रेसी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘गंगाजल’ आणि ‘मुस्कान’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
ग्रेसी सिंहचा व्हिडीओ होतोय व्हायरल
सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिचा आताचा आणि पूर्वीचा लूक दाखवला जात आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मुस्कान’ चित्रपटाची क्लिप यात पाहायला मिळते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचे वर्णन अतिशय सुंदर स्त्री, असं केलं आहे. अनेकांनी तिच्या ‘मुस्कान’ चित्रपटाचा व त्यातील गाण्यांचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट व त्यातील गाणी खूप सुंदर आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सक्रिय आहे ग्रेसी
ग्रेसी सिंग बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे व कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. ग्रेसी प्रशिक्षित ओडिसी आणि भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात द प्लॅनेट्स या डान्स ग्रुपबरोरब केली होती. तिने ‘अमानत’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.