बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णींनी यंदाच्या महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. पूर्ण विधींसह दीक्षा घेतल्यानंतर त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचे नावही बदलले आणि त्या यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून इतका वाद झाला की, त्यांनी राजीनामा दिला होता; पण तो स्वीकारला गेला नाही आणि त्या पदावर कायम राहिल्या. यावर आता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Lakshmi Narayan Tripathi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये ममता कुलकर्णींबद्दल (Mamta Kulkarni) म्हटलं, “ममता आता यमाई ममता नंदगिरी आहे. २३ वर्षं तिनं स्वतःला मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं. ती गेली अडीच-तीन वर्षांपासून माझ्या संपर्कात होती. जेव्हा ती कुंभ मेळ्याला आली तेव्हा मला भेटली आणि म्हणाली की, अर्धनारीश्वर माझा पट्टाभिषेक करतील आणि मी महामंडलेश्वर होईल. यापेक्षा चांगले काय असू शकते. मला माझे जीवन पूर्णपणे सनातन धर्माच्या कार्यासाठी समर्पित करायचे आहे. तर, तिची ही कल्पना आम्ही प्रत्यक्षात आणली.”
पुढे ममता कुलकर्णींचे अबू सालेमशी असलेले संबंध आणि इतर वादांवर स्पष्टीकरण देताना लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, “आम्हाला सर्व काही माहीत होते; पण ते सर्व खटले संपले आहेत. मग सनातन धर्मात आश्रय घेण्यासाठी येणाऱ्यांना आपण तुच्छ का मानावे? जर या ममताने इस्लाम स्वीकारला असता आणि ती हज-मदीनाला गेली असती, तर हे सनातनी लोक आता जेवढा विरोध करीत आहेत, तेवढा विरोध करू शकले असते का?”
पुढे लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, “ऋषी अजयदास यांना त्यांच्या कृत्यांबद्दल आधीच निरोप दिला आहे आणि या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा ममतावर इतका दबाव होता की, माझ्यामुळे आपल्या गुरूंना त्रास का? म्हणून तिने राजीनामा दिला होता. पण आम्ही तो स्वीकारला नाही. यमाई ममता नंदगिरी आहे, होती आणि राहील. ममता खूप संयमी आणि चांगली व्यक्ती आहे”.
दरम्यान, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है व ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून ममताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मग त्यांनी २००२ मध्ये आलेल्या ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटानंतर मनोरंजन क्षेत्राला अलविदा केले आणि त्या केनियाला गेल्या. त्यानंतर पुन्हा २४ वर्षांनी त्या भारतात परतल्या. भारतात परतताच त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.