लालू प्रसाद यादव हे बिहारमधील मोठे राजकारणी आहेत. १९९० ते १९९७ या काळामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. ते २००४ ते २००९ या कालखंडामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री देखील होते. सध्या ते राजकारणापासून लांब असले तरी ते काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांच्या पत्नीच्या आयुष्याशी निगडीत एक काल्पनिक वेब सीरिज ‘महाराणी’ लोकांसमोर आली होती, आता खुद्द लालू प्रसाद यादव यांच्यावरील बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘राष्ट्रीय जनता दल’च्या एका प्रमुख व्यक्तीने या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले ५ ते ६ महीने या चित्रपटावर काम सुरू आहे.” हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तामध्ये एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडून हक्क आणि परवानगी घेण्यात आली आहे.
आणखी वाचा : तब्बल २० वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; अमिताभ बच्चन व तुषार कपूरसह दुसऱ्या भागात कोण झळकणार? जाणून घ्या
प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून ते यावर काम करत आहेत. याबरोबरच लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी प्रसाद हे या चित्रपटाला आर्थिक मदतही करणार आहेत. अद्याप या चित्रपटाबद्दल फारशी माहिती बाहेर आलेली नाही, पण या चित्रपटातून लालू यांच्या आयुष्यातील बऱ्याच माहीत नसलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावरच यात कोणते कलाकार दिसणार आहे याबद्दल खुलासा केला जाईल. ‘राष्ट्रीय जनता दल’चे प्रवक्ते चितरंजन गगन यांनी या विषयावर उघडपणे भाष्य केलं नसलं तरी ते या चित्रपटाबद्दल खुलासा करत म्हणाले, “जर पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक बनत असेल तर ही फार उत्तम गोष्ट आहे. सर्व समाजातील वर्गातील तरूणांसाठी ही अत्यंत प्रेरणादायी कथा असेल. याआधीसुद्धा लालू यांच्यावर बरीच पुस्तकं लिहिली गेली असून चित्रपटही आले आहेत.”