बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा जलवा अजूनही कायम आहे. त्यांना ही नावं आणि प्रसिद्धी इतक्या सहजासहजी मिळाली नाहीत. प्रत्येक कलाकारांच्या वाटेला संघर्ष असतोच. तसाच बिग बींना देखील करिअरच्या सुरुवातीपासूनच खूप संघर्ष करावा लागला. या सिनेसृष्टीत त्यांना जवळपास पाच दशक पूर्ण झाली आहेत. या पाच दशकात त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीतील बिग बींच्या या कारकीर्दीबद्दल आणि योगदानाबद्दल यंदा त्यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला होता. यंदा हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळ्याची आज घोषणा झाली. पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली.
दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांच्यासह संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार होणार आहे.
अशोक सराफ, अतुल परचुरे अन् पद्मिनी कोल्हापूरे यांचा देखील होणार गौरव
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार, पद्मिनी कोल्हापूरे यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार, अतुल परचुरे यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार, रणदीप हुड्डाला मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार, भाऊ तोरसेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार आदी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे.