‘मेरी आवाज ही पहचान है’ म्हणत आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातल्या रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेली गाणी चिरंतन स्मरणात राहणारी अशीच आहेत. लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांमधून त्या सदैव आपल्याबरोबर अजरामर राहतील. गाण्याच्या माध्यमातून एक सम्यक अनुभव चाहत्यांना देणाऱ्या भारतरत्न लतादीदींच्या कारर्कीदीचा घेतलेला धांडोळा…
२८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म पंडित दिनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांच्या पोटील झाला होता. लतादीदींना त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या पाच मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. त्यांचे मूळ नाव हेमा होते, पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांचं नाव लता असं ठेवण्यात आलं होतं.
Lata Mangeshkar : भारताचा, भेदांपलीकडला सूर..
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. लतादीदी १३ वर्षांच्या असताना १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरात सर्वात मोठ्या असल्याने वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. १९४५ मध्ये त्या कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले. त्यानंतर त्यांनी हजारो गाणी गायली.
लतादीदींनी दोन चित्रपटांत केला होता अभिनय
बहुभाषिक गाणी गाणाऱ्या दीदींनी सुरुवातीच्या काळात ‘किती हंसाल’ आणि ‘पहिली मंगळागौर’ या दोन मराठी चित्रपटात अभिनयही केला होता. त्या नकला फार उत्तम करत आणि पन्हाळ्यावर फोटोग्राफी करण्याची त्यांना आवड होती.
हेही वाचा – Lata Mangeshkar : नव्वदोत्तरी पिढीने जाणलेली लता..
गाणं ही बाबांची देण – लता मंगेशकर
“माझं गाणं हीच बाबांची मला देन आहे. त्यांची सूर लावायची पद्धत, सूर सोडताना ‘जोर’ देणं कमाल होते. मी लहान होते, सगळं आठवत नाही, पण एवढंच सांगेन की स्टेजवर ते विलक्षण गायचे. ‘धि:क्कार मन साहिना’ या गाण्याला मुंबईच्या ग्रँड थिएटरात १४ वन्समोअर घेतलेले मी पाहिलेत. बाबांना वन्समोअर मिळाला की ते ‘राग’ बदलून गात,” असं एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या.
लतादीदींनी लग्न का केलं नाही?
एका मुलाखतीत लतादीदींना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “मी १३ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. मी भावंडांमध्ये सर्वात मोठी होते. त्यामुळे तरुण वयातच कुटुंब सांभाळण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं. मी अनेकदा लग्नाचा विचार केला होता. पण भावंडांची, कुटुंबाची आणि घरची जबाबदारी सांभाळण्यात माझा वेळ निघून गेला. त्यामुळे मी लग्न केलं नाही.”
हेही वाचा – Lata Mangeshkar : अजरामर स्वर
आशा भोसले व लतादीदींमधील दुरावा
आशाताई अवघ्या १६ वर्षांच्या असताना त्यांनी गणपतराव भोसलेंशी लग्न केलं. त्यांच्या या निर्णयाने मंगेशकर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्यांनी गणपतराव भोसलेंशी लग्न केल्यानंतर आशाताई आणि लता मंगेशकर यांच्यात दुरावा निर्माण झाला. कारण त्यांचा हा निर्णय कुटुंबात कुणालाच आवडला नव्हता. आशाताई व लतादीदींमध्ये दीर्घकाल अबोला होता, असंही म्हटलं जातं. पण आम्ही आशाशी बोलणं बंद केलं नव्हतं तर तिने आमच्याशी बोलायचं नाही अशी ताकीद भोसलेंनी आशाताईंना दिली होती, असं लतादीदी एकदा म्हणाल्या होत्या.
आशाताईंनी सांगितलेले लतादीदींमधील गुण-दोष
‘रसरंग’च्या एका अंकात आशाताईंनी लतादीदींचे गुण-दोष सांगितले होते. “प्रत्येक माणसात गुणांबरोबर दोषही असतातच. आमच्या थोरलीचा सर्वात मोठा दोष म्हणजे ती थोडी हलक्या कानाची आहे. थोडीफार संशयी वृत्तीची आहे. कुणी तिची कोणती वस्तू घेतली असली तर तिचा तिला कधीच विसर पडत नाही. साडी देईल आणि आपण ती दहा वर्षांनंतर नेसली तरी ती जेव्हा बघेल तेव्हा हळूच म्हणेल ‘ही साडी मी कुठंतरी पाहिली आहे.’ पण तिचे गुण एवढे मोठे आहेत की त्यापुढं हे दोष असून नसल्यासारखेच आहेत,” असं आशाताई म्हणाल्या होत्या.
हेही वाचा – Lata Mangeshkar : संगीताहून मोठा बनलेला आवाज
लता मंगेशकर नेहमी पांढऱ्या रंगाची साडी का नेसायच्या?
पांढरी साडी नेसण्यामागचं कारण लतादीदींनी स्वतःच सांगितलं होतं. “मला लहानपणापासून पांढरा रंग फार आवडायचा. मी लहान असतना घागरा चोळी घालायची ती ही पांढऱ्या रंगाची असायची. पण मधल्या काळात मी रंगीत साड्या नेसायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी प्रत्येक रंगाच्या साड्या नेसायची. मग एक-दोन वर्षांनी असं वाटलं रंगांच्या आवडीला अंत नाही. मला आज गुलाबी, उद्या पिवळा आणि परवा निळा हे रंग आवडतील. म्हणून मी आजपासून पांढऱ्या रंगाशिवाय काहीही घालणार नाही असा निर्णय एकेदिवशी घेतला. तेव्हापासून मी पांढऱ्या साड्या नेसते,” असंही लतादीदींनी सांगितलं होतं.
हेही वाचा – आशा भोसलेंनी लिहिलेलं Lata Mangeshkar : थोरली
लता मंगेशकर म्हणजे भारताची दैनंदिन संस्कृती – गुलजार
“सकाळी उठून रेडिओ लावला की पहिला सूर लता मंगेशकरांचाच कानावर पडायचा. दुपारी, संध्याकाळी, रात्री रेडिओ लावला की त्यांचं गाणं ऐकायला मिळतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत त्यांची वेगवेगळी गाणी कानांवर पडतात. त्याशिवाय होळी आली लता मंगेशकरांचं गाणं.. रक्षाबंधन आलं त्यांचं गाणं.. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये त्यांचं गाणं.. बैसाखी आली तर त्यांचं गाणं, त्यांनी प्रत्येक भाषेत गाणं गायलं आहे. दिवाळी असो, ईद असो, कोणताही सण असो.. एवढंच कशाला लग्न असलं तरी त्यांचंच गाणं.. माझं असं म्हणणं आहे की शी वॉज कल्चर ऑफ एव्हरीथिंग. लता मंगेशकर म्हणजे भारताची दैनंदिन संस्कृती. त्या म्हणजे सगळय़ा जाती, धर्माच्या पलीकडे जाणारी भारताची संस्कृती. त्या म्हणजे कला, त्या म्हणजे संगीत,” असं गुलजार लतादीदींबदद्ल लोकसत्ताशी बोलताना म्हणाले होते.
लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार
लता मंगेशकर यांनी देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न (२००१) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याशिवाय पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (१९६९), ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी १९६५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१९९७), तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मध्य प्रदेश सन्मान (१९८४) या पुरस्कारांचाही समावेश आहे.
९२ वर्षी घेतला अखेरचा श्वास
लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. नंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.