दिवंगत लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘लुका छुपी’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील या गाण्याबद्दल दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी काही आठवणी सांगितल्या. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लता मंगेशकर मुंबईहून चेन्नईला गेल्या होत्या. तसेच त्यांनी गाणं रेकॉर्ड करण्याआधी सराव केला होता आणि पूर्णवेळ उभे राहून हे गाणं गायलं होतं, असं मेहरा म्हणाले.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ओटू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर गायनाप्रती किती समर्पित होत्या ते सांगितलं. तसेच गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी त्या रिहर्सल करायच्या, त्याबद्दलही आठवण सांगितली. “लताजींनी गाण्याची रिहर्सल केली, हीच त्यांची महानता आहे. त्यांनी मला फोन करून विचारलं की त्या गाणं रेकॉर्ड करण्यासाठी चेन्नईला जाऊ शकतात का? मी त्यांना सांगितलं की ए आर रहमान त्यांच्याबरोबर रेकॉर्ड करण्यासाठी मुंबईला येतील, पण त्यांनी चेन्नईला जाण्याचा आग्रह धरला. त्या मला म्हणाल्या, ‘ते इथे येण्याऐवजी मी गेलेलं बरं राहील.’ यावरून कळतं की त्या किती नम्र होत्या. ती तीन दिवसाआधी चेन्नईला गेल्या आणि विमानतळावरून थेट स्टुडिओत गेल्या. तिथे ए आर रहमान यांनी त्यांचं स्वागत केलं आणि लता मंगेशकरांची रचना ऐकली. त्यांनी हे गाणे कॅसेटमध्ये द्यायला सांगितलं, जेणेकरून त्या सराव करू शकतील.”
८ ते १० तास बसण्यास नकार दिला – मेहरा
मेहरा पुढे म्हणाले, “चौथ्या दिवशी जेव्हा त्या रेकॉर्डिंगसाठी आल्या, तेव्हा त्यांनी गाणं उभं राहून गाण्याचा आग्रह धरला. त्या रहमान यांच्याबरोबर गाणं गाऊ लागल्या आणि जॅमिंग करू लागल्या. त्यांनी ८ ते १० तास बसण्यास नकार दिला आणि गाणं पूर्ण होईपर्यंत त्या उभ्या राहिल्या.”
२०२२ मध्ये लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या वारशाबद्दल मेहरा म्हणाले, “लता मंगेशकर कुठे गेल्या? त्या कुठेच गेल्या नाहीत. माझ्या जन्माआधीही त्या आमच्याबरोबर होत्या आणि मी गेल्यानंतरही लता मंगेशकर इथेच असतील. त्या कायम जिवंत राहतील.”
‘रंग दे बसंती’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत, इतकी गाजली होती. आमिर खान, सिद्धार्थ नारायण, सोहा अली खान, कुणाल कपूर, माधवन, शरमन जोशी, अतुल कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात होते.