दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहीण सईदा इक्बाल खान यांचे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झाले. सईदाच्या कुटुंबीयांनी सोमवारी सईदा यांना श्रद्धांजली वाहिली. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सईदा दीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. मुंबईतील वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ येथील त्यांच्या बंगल्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
“…तर मी विकृत आहे”, राम गोपाल वर्मांचे विधान; म्हणाले, “तुमचे कुटुंब, देव आणि सामाजिक मान्यता…”
२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये सईदा खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सईदा यांची मुलं इल्हाम आणि साकिब हे देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भाग आहेत. इल्हाम लेखक आहेत, तर साकिब हा चित्रपट निर्माते आहे. सईदा यांची प्रार्थना सभा आज (२६ सप्टेंबर) सायंकाळी मेहबूब स्टुडिओमध्ये होणार आहे.
दिलीप कुमार यांना सहा बहिणी होत्या. फौजिया खान, सकीना खान, ताज खान, फरीदा खान, सईदा खान आणि अख्तर आसिफ आणि पाच भाऊ नासिर खान, अस्लम खान, एहसान खान, नूर मोहम्मद, आयुब सरवर होते. सईदा दिवंगत इक्बाल खान यांच्या पत्नी होत्या. ते दिग्गज चित्रपट निर्माते आणि मेहबूब स्टुडिओचे संस्थापक, मेहबूब खान यांचे पूत्र होते. इक्बाल खान यांचे २०१८ मध्ये निधन झाले.