दिवंगत बॉलीवूड अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांची आज मंगळवारी (७ जानेवारी रोजी) ५८ वी जयंती आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांचे नॅशनल स्कूल ड्रामामधील बॅचमेट व अभिनेते आलोक चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. आलोक चॅटर्जी ६४ वर्षांचे होते.
रंगभूमी अभिनेते आलोक चॅटर्जी यांचे सोमवारी रात्री ११ वाजता निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. आलोक हे दिवंगत बॉलीवूड अभिनेते आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (NSD) माजी विद्यार्थी होते. ते व दिवंगत इरफान खान दोघेही खूप जवळचे मित्र होते.
गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे यांनी आलोक चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पोस्ट केली आहे. त्यांनी आलोक यांचे फोटो पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. “आलोक चॅटर्जी… एका उत्तम अभिनेत्याचे निधन झाले! ते एनएसडीमध्ये इरफानचे बॅचमेट होते. जर इरफान कालिदास होते, तर आलोक चॅटर्जी विलोम होते! विलोम कालिदासला भेटायला निघून गेले,” असं कॅप्शन स्वानंद किरकिरे यांनी फोटोंना दिलं आहे.
हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
पाहा पोस्ट –
इरफान खान व आलोक चॅटर्जी १९८४ ते १९८७ या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिकले होते. या काळात इरफान व आलोक यांनी अनेक नाटकांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं होतं. आलोक यांनी भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्ट मोलाचं योगदान दिलं होतं. त्यांच्या योगदानासाठी आलोक यांना २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी मध्य प्रदेश स्कूल ऑफ ड्रामाचे (MPSD) संचालक म्हणूनही काम केलं होतं.