Sanjeev Kumar Hema Malini : दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपट केले. संजीव कुमार यांचं खरं नाव हरिहर जेठालाल जरीवाला होतं. चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संजीव कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. संजीव यांचं हेमा मालिनी यांच्यावर प्रेम होतं. मात्र, हेमा यांच्या आईच्या एका अटीमुळे दोघांचं लग्न होता होता राहिलं.

संजीव यांचं नाव त्याकाळी नूतन आणि सायरा बानू यांच्यासह त्यांच्या काळातील अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. पण संजीव यांचं हेमा मालिनीवर खूप प्रेम होतं. १९७२ मध्ये ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजीव व हेमा यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.

हनीफ झवेरी आणि सेमंत बटारा यांनी लिहिलेल्या संजीव कुमार यांच्यावरील ‘ॲन ॲक्टर्स ॲक्टर’ या पुस्तकानुसार, महाबळेश्वरमध्ये ‘हवा के साथ साथ’ या लोकप्रिय गाण्याच्या शूटिंगदरम्यान ट्रॉलीला अपघात झाला होता. या अपघातातून संजीव व हेमा थोडक्यात बचावले होते. या घटनेनंतर हे दोघे खूप जवळ आले.

संजीव कुमार यांनी अखेर हेमा मालिनींसमोर प्रेमाची कबुली देत, लग्न करायचंय असं सांगितलं. दुसरीकडे, संजीव यांच्या आई शांताबेन यांची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलाने अभिनेत्रीशी लग्न करावं. पण हेमा त्यांच्या घरी गेल्यावर शांताबेन त्यांच्या साधेपणाने प्रभावित झाल्या आणि लग्नाला मान्यता दिली. पण नंतर मात्र दोन्ही कुटुंबात मोठे मतभेद झाले.

हेमा मालिनींच्या आईची अट

लग्नानंतर हेमाची आई जया चक्रवर्ती यांनी एक अट घातली की त्यांची मुलगी लग्नानंतरही अभिनय करत राहील. संजीव कुमार आणि त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा मात्र वेगळी होती. लग्नानंतर हेमा यांनी करिअर सोडून संसार करावा, असं त्यांना वाटत होतं.

sanjeev kumar hema malini
संजीव कुमार (फोटो – स्क्रीनशॉट)

…अन् सगळंच संपलं

हेमा मालिनी यांनी साईन केलेले चित्रपट पूर्ण करणार असल्याचं वचन निर्मात्यांना दिलं होतं. करिअरसाठी संजीव पाठिंबा देतील, अशी आशा हेमा यांना होती. पण हेमा व संजीव दोघांचीही कुटुंबे तडजोड करायला तयार नव्हती. याच कारणाने हे नातं संपलं.

१९७० च्या काळात महिलांनी चित्रपटांमध्ये करिअर करणं हीच मोठी गोष्ट होती. लग्नानंतरही हेमा काम करतील, ही त्यांच्या आईची अट संजीव यांच्या कुटुंबाने मान्य केली नाही आणि हे नातं संपुष्टात आलं. संजीव व हेमा यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण नातं संपल्यानंतर त्यांनी कधीच एकत्र कामही केलं नाही. संजीव कुमार यांनी लग्नच केलं नाही. त्यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले.