‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्री सौंदर्याचा मृत्यू अपघाती झाला नव्हता तर मालमत्तेच्या वादातून तेलुगू अभिनेते मोहन बाबू यांनी तिची हत्या घडवून आली, असा आरोप होत आहे. मोहन बाबू यांनी सौंदर्यावर तेलंगणातील शमशाबादमधील जल्लेपल्ली येथील सहा एकर जागेवरील गेस्ट हाऊस विकण्यास दबाव टाकला होता, असा दावा केला जात आहे. यासंदर्भात सौंदर्याचे पती जीएस रघू यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे.
सौंदर्याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर तब्बल २२ वर्षांनी चिट्टीमल्लू नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने यासंदर्भात तक्रार दिली आहे. मोहन बाबूने सौंदर्याला तिचे गेस्ट हाऊस विकण्यास सांगितलं होतं. मात्र, तिचा भाऊ अमरनाथने त्यास नकार दिला. मोहन बाबू जल्लेपल्ली येथील गेस्ट हाऊस वापरत असल्याचा दावाही या कार्यकर्त्याने केला आहे.
सौंदर्याच्या पतीने हे वृत्त खोटे असल्याचं म्हटलं आहे. “मागील काही दिवसांपासून हैदराबादमधील मालमत्तेबद्दल मोहन बाबू आणि सौंदर्या यांच्यासंदर्भात खोट्या बातम्या येत आहेत. या मालमत्तेबाबत पसरलेल्या तथ्यहीन बातम्यांचे मी खंडन करतेय. माझी दिवंगत पत्नी सौंदर्याकडून मोहन बाबू यांनी बेकायदेशीरपणे कोणतीही मालमत्ता घेतलेली नाही,” असं जीएस रघू म्हणाले.
“माझ्या माहितीनुसार आमचा त्यांच्याशी कधीही जमिनीचा व्यवहार झालेला नाही. मी मोहन बाबू यांना मागील २५ पेक्षा जास्त वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्याशी चांगली मैत्री आहे. आमची कुटुंबं, माझी पत्नी, माझी सासू आणि मेहुणे एकमेकांचा खूप आदर करतात. मी पुन्हा एकदा सांगतोय की मोहन बाबू यांच्याशी आमचा कोणताही मालमत्तेचा व्यवहार झालेला नाही. ही खोटी बातमी आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवणं थांबवा, अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे,” असं जीएस रघू म्हणाले.
दरम्यान, मोहन बाबू यांनी अद्याप या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
२२ वर्षांपूर्वी झाले सौंदर्याचे निधन
सौंदर्या २००४ मध्ये राजकारणात आली. ती एका राजकीय प्रचारसभेसाठी करीमनगरला जात होती. तिच्याबरोबर तिचा भाऊ अमरनाथही होता. चार्टर्ड विमानाने तिच्यासह चार जण जात होते. मात्र विमान १०० फूट उंचीवर असताना आग लागून कोसळलं. या घटनेत सौंदर्या, तिचा भाऊ आणि इतर दोन जण ठार झाले होते.