Om Puri Affairs : दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूरने त्यांच्या अफेअर्सबद्दल खुलासे केले आहेत. ओम पुरी एका हॉलीवूड चित्रपटात काम करत असताना नंदिता नावाच्या महिला पत्रकाराच्या प्रेमात पडले होते. तसेच लग्नाच्या एक दिवस आधी त्यांनी घरातील मदतनीसबरोबर प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. ओम व सीमा एक दशकाहून जास्त काळ एकमेकांना ओळखत होते, पण तरी त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. नंदिताबरोबर अफेअर असल्याचं समजल्यानंतर काही महिन्यांनी सीमा ओमपासून वेगळी झाली. सीमा ही अभिनेता अन्नू कपूरची बहीण आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत सीमा म्हणाली, “आमची १९८९ मध्ये एंगेजमेंट झाली होती, आणि मला का माहीत नाही, पण दोन्ही कुटुंबांनी आमच्या लग्नासाठी घाई केली. अन्नू (अन्नू कपूर) शूटिंगसाठी बाहेर होता आणि त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नाची गोष्ट दुसऱ्या व्यक्तीकडून कळाल्याने तो खूप नाराज झाला होता. त्या काळी फोनचे प्रमाण जास्त नव्हते. लग्नाच्या एक दिवसाआधी त्याने घरी फोन करून मला त्याच्या मदतनीसबरोबरच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं.”

तो मला नदीवर घेऊन गेला अन्…

ओम यांनी त्याबद्दल सांगितल्यावर सीमाला तिची प्रतिक्रिया काय होती, असं विचारण्यात आलं. त्यावर हे ऐकून धक्का बसला, असं तिने सांगितलं. “लग्नाची निमंत्रणं सर्वांना पाठवण्यात आली होती. आमचं रिसेप्शन होणार होतं. आम्ही झालवाड या छोट्याशा गावातले होतो. गावात माझ्या आई-वडिलांचा मान-सन्मान होता. तो मला नदीवर घेऊन गेला आणि काहीतरी सांगायचंय असं म्हणाला. एक दिवसाआधी जे समजलं ते ऐकून लग्न मोडण्याची हिंमत माझी झाली नाही. आता स्त्रिया खूप खंबीर झाल्या आहेत,” असं सीमा म्हणाली.

सामाजिक दबावामुळे केलं लग्न – सीमा कपूर

ओमला निवडावं की स्वाभिमान या विचारात अडकलेल्या सीमाने सामाजिक दबावामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला. “त्याने जे सांगितलं ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला मला थोडा वेळ हवा होता. त्याने मला का हे सगळं तेव्हा का सांगितलं ते मला समजलं नाही; कदाचित त्याने मला आधीच हे सांगितलं असतं तर परिस्थिती वेगळी असती. पुरुषी वृत्ती अशी असते, त्यांना वाटतं की ते प्रामाणिक आहेत आणि तुम्हाला निर्णय घ्यायला सांगत आहेत. पण तो माइंड गेम खेळणारा होता, असं मला वाटत नाही”, असं सीमा म्हणाली.

सीमा म्हणाली की त्यावेळी ती अशी नाजूक परिस्थिती हाताळण्यास सक्षम नव्हती. तिला वाटलं की इतरांना याचा त्रास होईल. आता हे घडलं असतं तर कदाचित त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला असता, असं सीमाने सांगितलं. या मुलाखतीत तिने ओम पुरी यांचे नंदिताबरोबरचे अफेअर, त्यामुळे झालेला मानसिक आघात आणि त्यानंतरच्या कायदेशीर लढाईबद्दल भाष्य केलं. ओम यांनी आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितली होती, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांच्या संपर्कात राहिल्याचं सीमाने सांगितलं. मदतीनसबरोबर ओम पुरी यांचे संबंध आयुष्यभर होते, यामुळे त्यांच्यात आणि नंदितामध्येही बरेचदा खटके उडायचे, असं सीमा कपूर म्हणाल्या.