सध्या सगळीकडे होळीचा उत्साह आहे. देशातील विविध भागांत होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही जल्लोषात दरवर्षी होळी साजरी करताना दिसतात. होळीनिमित्त बॉलिवूडकरांकडून मोठमोठ्या जंगी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्याचे फोटो व व्हिडीओही व्हायरल होत असतात. दिवंगत बॉलिवूड अभिनेता राज कपूरही होळी मोठ्या उत्साहाने साजरी करायचे.
राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये होळीसाठी पार्टीचं आयोजन केलं जायचं. सेलिब्रिटींबरोबर होळी साजरी केल्यानंतर राज कपूर तृतीयपंथियांबरोबर होळीचा सण साजरा करायचे. तृतीयपंथियांवर त्यांचा खूप विश्वास होता. त्यामुळेच ते दरवर्षी त्यांच्याबरोबर रंगाची उधळण करायचे. राज कपूर त्यांच्या चित्रपटातील गाण्यांसाठी तृतीयपंथियांकडून संमती घ्यायचे, एवढा त्यांचा या बांधवांवर विश्वास होता. तृतीयपंथियांनी गाण्याला पसंती दर्शविली तरच राज कपूर यांचं गाणं चित्रपटात दिसायचं. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातील गाण्याचा एक किस्सा सांगितला जातो.
हेही वाचा>> Video: एकेकाळी छोट्याशा घरात राहत होती अनुष्का शर्मा, अभिनेत्री जुन्या घराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील एका गाण्याला तृतीयपंथीय लोकांनी संमती दिली नव्हती. त्यामुळे राज कपूर यांनी संगीतकार रविंद्र जैन यांच्याशी बोलून गाण्यात बदल करण्यास सांगितलं. त्यानंतर चित्रपटातील ‘सुन साहिबा सुन’ हे गाणं तयार झालं. तृतीयपंथियांनाही हे गाणं फारच आवडलं. “हे गाणं अजरामर होईल. पुढील कित्येक वर्ष हे गाणं लक्षात राहील”, असं तृतीयपंथीय राज कपूर यांना म्हणाले होते. तृतीयपंथियांच्या म्हणण्यानुसार राज कपूर यांचं हे गाणं हिटही झालं.
हेही वाचा>> होळीत बांबूच्या झाडाची लाकडे जाळल्याने शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले “हिंदू धर्मात…”
चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी राज कपूर यांच्या तृतीयपंथियांबरोबर होळी साजरी करण्याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. “आर के स्टुडिओमधून सगळे जण निघून गेल्यानंतर राज कपूर संध्याकाळी ४ वाजता तृतीयपंथियांबरोबर होळी साजरी करायचे. तृतीयपंथी स्वत: त्यांना भेटायला यायचे. स्टुडिओमध्ये राज कपूर तृतीयपंथियांबरोबर गाणी गात, डान्स करत होळीचा आनंद घ्यायचे. परंतु, राज कपूर यांचं निधन झाल्यानंतर आर के स्टुडिओमध्ये अशी पार्टी आयोजित केली गेली नाही”, असं ते म्हणाले होते.