Sharad Ponkshe: ‘छावा’ चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. विकी कौशलने या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, संतोष जुवेकर सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, निलकांती पाटेकर, आस्ताद काळे या मराठी कलाकारांनी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मध्ये विविध भूमिका साकारल्या आहे. नुकतंच ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर शुभंकर एकबोटेने केलेली कमेंट चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पोंक्षे यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिला आणि त्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत त्यांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. तसेच या चित्रपटात झळकलेल्या सर्व मराठी कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या व्हिडीओवर ‘छावा’मध्ये धनाजी हे पात्र साकारणाऱ्या शुभंकर एकबोटेने कमेंट केली आहे.

काय म्हणाले होते शरद पोंक्षे?

“मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच उत्तम बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहायला हवा. रक्त खवळतं, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट शूट केला आहे, की त्यांचं कौतुक करायला हवं. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपापलं काम केलं आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं शरद पोंक्षे म्हणाले होते.

शुभंकर एकबोटेची कमेंट नेमकी काय?

“खूप खूप धन्यवाद काका…या चित्रपटाचा एक भाग होण्याची, छत्रपती संभाजी महाराजांच्या या महापराक्रमी शौर्यगाथेचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. All credit goes to Laxman Utekar Sir & Entire Team Chhaava…जय भवानी,” अशी कमेंट शुभंकर एकबोटेने शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर केली आहे.

शुभंकर एकबोटेची कमेंट (सौजन्य -इन्स्टाग्राम स्क्रीनशॉट)

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटाने ७ दिवसांत भारतात २२० कोटींहून जास्त कलेक्शन केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman utekar film chhaava shubhankar ekbote comment on sharad ponkshe chhaava review hrc