Laxmi Narayan Tripathi Mamta Kulkarni Expelled : ९० च्या दशकातील बोल्ड आणि ग्लॅमरस मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या संन्यास घेतल्याने चर्चेत आहे. ममताला आता प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पण तिच्या या नियुक्तीवरून बराच वाद झाला. त्यानंतर शुक्रवारी किन्नर आखाड्याने तिच्याकडून महामंडलेश्वर पद काढून घेतले आणि आखाड्यातून तिची हकालपट्टी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणाऱ्या डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावरही कारवाई झाली आहे. त्यांचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जर ममता कुलकर्णीने इस्लाम स्वीकारला असता, तर अजय दास काहीच बोलले नसते, असं त्रिपाठी म्हणाल्या. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करणाऱ्या अजय दास यांना या प्रकरणी कोर्टात नेणार असल्याचंही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

अजय दास यांना पदमुक्त केलं आहे – लक्ष्मी नारायण त्रिपाठी

लक्ष्मी नारायण यांनी अजय दास यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. किन्नर आखाड्याने २०१७ मध्ये ऋषी अजय दास यांना त्यांच्या पदावरून मुक्त केले होते, असं त्या म्हणाल्या. “जर मी या आखाड्याची संस्थापक असते तर किन्नर आखाड्यात राहिले असते, पण अजय दास किन्नर आखाड्यात का राहत नाही? ते इतर ठिकाणी राहतात. जर ममता कुलकर्णी यांनी इस्लाम स्वीकारला असता तर अजय दास काहीच बोलले नसते. दास यांनी अर्चना दासशी लग्न केले आहे आणि संसार करत आहेत. अजय दास यांच्या मुलीचे नाव कनक आणि त्यांचे कुटुंबदेखील आहे,” असा दावा लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केला.

ममता कुलकर्णी व लक्ष्मी नारायण त्रिपाठी (फोटो- इन्स्टाग्राम)

किन्नर आखाडा स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र

लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, “आम्ही हरी गिरी महाराजांचे शिष्य आहोत आणि हरी गिरी महाराज जे सांगतील तेच आम्ही करू. जुना आखाड्याशी आमचा करार आहे. किन्नर आखाडा स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. ऋषी अजय दास प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. अजय दास पत्नी आणि मुलीबरोबर जयपूरमध्ये राहतात. आम्ही त्यांना याप्रकरणी कोर्टात नेऊ.” न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, ममता कुलकर्णी व लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना हटवण्याचं कारण दास यांनी सांगितलं आहे. देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि आपल्या नकळत तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे, असं त्यांनी दास यांनी निवेदनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmi narayan tripathi reaction after being expelled with mamta kulkarni from kinnar akhara hrc