Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री दरोडेखोर शिरला होता. त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैफवर दरोडेखोराने धारदार चाकूने वार केले, ज्यामुळे सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. आता त्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी अपडेट दिली आहे.
सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज (शुक्रवारी) दिलेल्या माहितीनुसार, तो हल्ल्यात थोडक्यात बचावला. चाकू त्याच्या मणक्यापासून फक्त दोन मिलीमीटर दूर होता. सैफ आता बरा असून काळजी करण्याचे कारण नाही, असं डॉक्टरांनी नमूद केलं. तसेच सैफवर शस्त्रक्रिया करणारे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी तो खूप भाग्यवान असल्याने वेळीच रुग्णालयात पोहोचला, असं म्हटलं आहे.
दरम्यान, सैफच्या मणक्याजवळ चाकूचे जे टोक घुसले होते, त्याचा फोटो समोर आला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा त्याच्या शरीरातून काढला आहे.
पाहा फोटो –
“त्याची प्रकृती ठीक आहे आणि त्याने आज चालायलाही सुरुवात केली आहे. त्याला संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही मर्यादित लोकांनाच त्याला भेटू देत आहोत. सैफची रिकव्हरी समाधानकारक आहे,” असं डॉ. डांगे म्हणाले.
सैफला पुढील तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल, असं लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. वांद्रे पोलीस स्थानकात सध्या त्याची चौकशी केली जात आहे.