सध्या इंटरनेटचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. यात आता एआयमुळे अनेक गोष्टींची माहिती मिळवणे सहज सोपे झाले आहे. मात्र, याचा गैरवापरही वाढला आहे. त्यापासून प्रत्येकाला सावध राहणे गरजेचे आहे. अशात बॉलीवूड अभिनेत्री खुशी कपूर आणि अभिनेता जुनैद खान या दोघांनी एआयच्या गैरवापरावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी काय केले पाहिजे यावर दोघांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
खुशी आणि जुनैद दोघीही सध्या त्यांच्या ‘लवयापा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. खुशी कपूर आणि जुनैद खान या दोघांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली आहे. त्यावेळी मुलाखतीमध्ये खुशीने सांगितलं, “इंटरनेटवर एआयचा दुरुपयोग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याचा वापर करताना सावध राहिलं पाहिजे.”
“एआयमुळे इंटरनेटवर अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. लोकांनी सर्वांत आधी यापासून स्वत:ला वाचवलं पाहिजे”, असं खुशीने सांगितलं. ती पुढे म्हणाली, “मला वाटतं की कोणत्याही व्यक्तीने सहज एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. कारण हे खरंच विचित्र आणि भयावह आहे. आपण इंटरनेटवर जेव्हा काही पोस्ट करतो तेव्हा त्याची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. तसेच इंटरनेटवरील या गोष्टी कशा हाताळल्या पाहिजेत याचं पुरेसं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी आपल्याला स्वत:ला जास्त सावध राहणे आवश्यक आहे.”
इंटरनेटवर एखाद्या मुद्द्यावर व्यक्त होताना काळजी घ्या…
सोशल मीडियावर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यावर अनेक जण लगेचच व्यक्त होतात. मात्र, प्रेक्षकांनी यावर व्यक्त होताना काळजी घेतली पाहिजे, असं खुशीने सांगितलं आहे. ती म्हणाली, “लोक फक्त सोशल मीडियावर १० सेकंदांचा व्हिडीओ पाहून, त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. १० सेकंदांच्या व्हिडीओतून ती व्यक्ती तुम्हाला कितीशी समजणार आहे? तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनात सध्या काय सुरू आहे काय नाही याचा अंदाजही नसतो. तरी अनेक व्यक्ती त्यावर आपलं मत मांडतात. समोरच्या व्यक्तीला जज करतात. मला वाटतं एवढ्या लहान व्हिडीओतून कोणीही कुणालाही जज करू नये.”
जुनैद खाननेही यावर त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “आपण इंटरनेटवर नेहमी व्यक्त होतो. आपल्या अनेक गोष्टी शेअर करतो. मात्र, आपण आपल्या जीवनात पार्टनर आणि कुटुंबातील व्यक्तींशी वास्तविक एकत्र येत जास्त संवाद साधणे गरजेचे आहे.”
प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे
पुढे जुनैदने सोशल मीडियावर ज्या व्यक्ती आपलं मत व्यक्त करतात त्यांनी आधी दुसऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, असं सांगितलं आहे. तो म्हणाला, “व्यक्तींमध्ये फोन वापरण्याचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत, असं मला वाटतं. परिस्थिती कोणतीही असली तरी प्रत्येकानं समोरच्या व्यक्तीबदद्ल मनात आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अनेक घटनांमध्ये सोशल मीडियावर व्यक्ती चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होतात. त्यामुळे आपण प्रत्येकाविषयी मनात आदर ठेवणं आवश्यक आहे. व्यक्त होताना तुमचा हेतू बरोबर असणं महत्त्वाचं आहे.”