सध्या खुशी कपूर आणि जुनैद खान या दोन्ही स्टारकिड्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघांचाही रोमँटिक कॉमेडी ‘लवयापा’ चित्रपट शुक्रवारी (७ फेब्रुवारी) प्रदर्शित होत आहे. त्यामुळे खुशी आणि जुनैद त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र आहेत. नुकतीच त्यांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या दोघांच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा त्यांचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला.
कलाकार त्यांच्या कामामुळे मोठी प्रसिद्धी मिळवतात. चाहत्यांना कायम आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची उत्सुकता असते. तसेच चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातीलही अधिक माहिती जाणून घ्यावी, असे वाटत असते. जुनैद खान बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा आहे; तर खुशी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलागी आहे. कलाकारांची मुले असल्याने त्यांनादेखील सार्वजनिक ठिकाणी फिरताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना सहजपणे रिक्षा किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचा वापर करता येत नाही.
अशात मुलाखतीमध्ये ‘लवयापा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या जनैद आणि खुशीला भारतीने सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव विचारला. त्यावर खुशीने तिचा अनुभव सांगताना तिला याची परवानगी नव्हती, असे सांगितले. खुशीने आतापर्यंत रिक्षाने कधी प्रवास केला आहे का? या प्रश्नाचे उत्तर सांगताना ती म्हणाली, “मी रिक्षाने प्रवास केला आहे; मात्र ती रिक्षा मी थेट माझ्या घराच्या अंगणातूनच पकडली आहे.” खुशीने दिलेली प्रतिक्रिया ऐकून भारती चकित होते. ती याचे कारण विचारते. त्यावर कारण सांगताना खुशी म्हणते, “खरं तर मला रिक्षानं प्रवास करण्याची परवानगी नव्हती. माझ्या आई-बाबांचा यासाठी मला विरोध होता. त्यांनी मला रिक्षानं प्रवास करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे मी रिक्षानं फक्त शूटिंगसाठी मढ आयलँडपर्यंत जात होते.”
मुलाखतीमध्ये पुढे जुनैदनेही त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मला रिक्षानं प्रवास करताना काही अडचण नव्हती. कारण- मला कोणीही ओळखत नव्हतं. मी अनेकदा सहजपणे रिक्षानं प्रवास केला आहे आणि आताही करतो.”
जुनैदने पुढे एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “एकदा मी अंधेरीपासून वांद्र्याला जाण्यासाठी रिक्षात बसलो. त्यावेळी बाबासुद्धा बाहेर होते. ते त्यांच्या कारने प्रवास करीत होते. अचानक सिग्नलला त्यांची कार आणि माझी रिक्षा थांबली. त्यांनी लगेचच कारची काच खाली करत मला आवाज दिला आणि हाय केलं. त्यावर मीसुद्धा त्यांना हाय म्हटलं. तेव्हा रिक्षाचालक चकित झाला. नेमकं काय घडलं हे त्याला कळेना. त्यावेळी त्यानं मला विचारलं ते तुला ओळखतात का? त्यावेळी मी म्हणालो की, हो मी त्यांच्या परिसरात राहतो. माझी आजी आणि त्यांची आई वाराणसीच्या आहेत.” जुनैदने सांगितलेला हा किस्सा ऐकून सर्वच हसू लागतात.