अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसलेल्या अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आताचे कलाकारच नाही तर अगदी ७० आणि ८० च्या दशकात सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेते व अभिनेत्रींना खूप संघर्ष करावा लागला होता. याच यादीत एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचाही समावेश आहे. त्यांनाही अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. ते अनेकदा प्रवासासाठी पैसे वाचवायला उपाशी राहायचे. याबाबत त्यांचा मुलगा लव सिन्हाने खुलासा केला आहे. तो लवकरच ‘गदर २’ मध्ये दिसणार आहे.
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
लवने ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या संघर्षाबाबत खुलासा केला. तो म्हणाला, “अनेकदा असं व्हायचं की वडिलांना बसने प्रवास करणं आणि जेवण करणं यापैकी एक पर्याय निवडावा लागायचा. एकतर त्यांना मीटिंगसाठी बसने प्रवास करता यायचा किंवा जेवण करता यायचं. अनेक वेळा वडिलांना पैसे वाचवण्यासाठी कित्येक मैल चालत जावं लागायचं. अनेकदा ते पैसे वाचवण्यासाठी उपाशी राहायचे.” हे सांगताना लव भावुक झाला.
लव सिन्हाने सांगितलं की त्याच्या वडिलांनी चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी घर सोडलं होतं आणि पटनाहून मुंबईत आले होते. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांना नेहमीच भीती वाटायची की अभिनेता बनण्यात आपल्याला यश आलं नाही तर काय करणार. कारण त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांचा भंग व्हावा, असं त्यांना वाटत नव्हतं. लव सिन्हा म्हणाला, “जेव्हा बाबा यशस्वी झाले, तेव्हा आमचं लहानसं घरही लोकांनी भरलेलं राहायचं. आणि जेव्हा त्यांचे चित्रपट चालणं बंद झालं तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हतं. घरी कोणीही यायचं नाही. त्यामुळे मी वडिलांना त्यांच्या यशाच्या काळात आणि त्यांच्या वाईट काळातून सावरताना पाहिलं आहे.”
दरम्यान, ‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल तारा सिंग आणि सकिना यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लव सिन्हादेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटात उत्कर्ष गुप्ता, सिमरत कौर आणि मनीष वाधवा यांच्याही भूमिका आहेत.