बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. सोनाक्षी व झहीरच्या आंतरधर्मीय लग्नाला अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती, पण तिचे जुळे भाऊ लव व कुश दिसले नव्हते. त्यामुळे दोघेही लहान बहिणीच्या लग्नात गैरहजर असल्याच्या चर्चा होत्या, अखेर लव सिन्हाने याबाबत मौन सोडलं आहे. लव सोनाक्षी व झहीरच्या लग्नाला गेला नव्हता, असा खुलासा त्यानेच केला आहे.
बहिणीच्या लग्नाच्या एका आठवड्यानंतर ३० जून रोजी लवने एक्सवर सोनाक्षीच्या लग्नासंदर्भात एका बातमीवर पोस्ट केली. “बातमीसाठी त्याच्या फॅमिली बिझनेसची एक गोष्ट लिहिली गेली, ज्यामुळे त्यांच्या काळ्या बाजूकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही. जसे की वराच्या वडिलांची राजकारण्यांशी जवळीक, ज्यांची ईडी चौकशी ‘वॉशिंग मशीन’ मध्ये गायब झाली. तसेच वराचे वडील दुबईत राहतात याचीही कुणाला कल्पना नव्हती,” असं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या
“मी या लग्नात सहभागी का झालो नाही याची ही स्पष्ट कारणं आहेत आणि काहीही असो मी काही लोकांबरोबर कधीच नातं ठेवू शकत नाही. मला आनंद आहे की माध्यमातील काही लोकांनी पीआर टीमने पसरवलेल्या काल्पनिक गोष्टींवर अवलंबून न राहता संशोधन केलं,” अशी पोस्ट लव सिन्हाने एक्सवर केली आहे.
सोनाक्षी व झहीरचं नोंदणी पद्धतीने लग्न
सात वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचं लग्न मुंबईतील वांद्रे येथील अभिनेत्रीच्या घरी नोंदणी पद्धतीने झालं. या लग्नाला सोनाक्षी व झहीरशिवाय दोघांचेही कुटुंबीय व काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. सोनाक्षीच्या बाजूने फक्त तिचे वडील खासदार शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा हजर होते. तिचे दोन्ही भाऊ लव व कुश आणि वहिनी याठिकाणी नव्हते. सोनाक्षी व झहीरचं रिसेप्शन मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये पार पडलं होतं. त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल
शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. लवने वडिलांच्या प्रकृतीची माहिती देताना त्यांना ताप असल्याचं सांगितलं होतं. सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सिन्हा कुटुंबात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. अशातच लव सिन्हाची लग्नाला गैरहजेरी व त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.