रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.
फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. नुकतंच प्रसिद्ध गीतकार, कवि, गायक व अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले स्वानंद किरकिरे यांनी या चित्रपटाचं नाव न घेताच यावर टीका केली आहे.
आणखी वाचा : “सेक्स आणि हिंसा…” ‘अॅनिमल’च्या रिलीजनंतर परफेक्शनिस्ट आमिर खानचं ‘ते’ जुनं वक्तव्य चर्चेत
‘एक्स’ या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरुन वेगवेगळी ट्वीट करत स्वानंद यांनी त्यांचं मत मांडलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “गुरुदत्त यांचा ‘साहेब बीबी और गुलाम’, हृषीकेश मुखर्जी यांचा ‘अनुपमा’, श्याम बेनेगल यांचा ‘अंकुर’ आणि ‘भूमिका’, केतन मेहता यांचा ‘मिर्च मसाला’, सुधीर मिश्रा यांचा ‘मै जिंदा हूं’, गौरी शिंदेचा ‘इंग्लिश विंग्लिश’, बहल यांचा ‘क्वीन’, शुजित सरकार यांचा ‘पिकू’ – भारतीय चित्रपट इतिहासातील असे बरेच चित्रपट आहेत ज्यांच्या माध्यमातून स्त्री व तिचे अधिकार आणि स्वायत्तता यांचा आदर करायला मी शिकलो. परंतु आज ‘अॅनिमल’सारखा चित्रपट पाहून खरोखर आजच्या पिढीच्या स्त्रियांची मला दया आली. त्यांच्यासाठी पुन्हा एक असा पुरुष तयार करण्यात आला आहे जो प्रचंड भयावह आहे.”
पुढे ट्वीट करत ते म्हणतात, “हा पुरुष तुमचा आदर न करता तुमच्यावर दबाव आणतो अन् त्यावर त्याला गर्व असल्याच्या या वृत्तीला पुरुषार्थ समजतो आहे. आजच्या पिढीच्या मुलींना जेव्हा मी रश्मिकाला पडद्यावर मार खाण्यावर टाळ्या वाजवताना पाहिलं तेव्हा मनोमन मी समानतेच्या प्रत्येक विचाराला श्रद्धांजलीच वाहिली. आता मी घरी आलोय, अत्यंत हताश आणि दुर्बल आहे. अल्फा मेल या संकल्पनेबाबत रणबीर म्हणतो की जे पुरुष अल्फा मेल बनू शकत नाही ते स्त्रियांचा भोग मिळवण्यासाठी कवि बनतात अन् चंद्र तारे तोडून आणण्याचइ भंपक आश्वासने देतात. मी पण एक कवि आहे अन् मी जगण्यासाठी कविता करतो, इथे मला जागा आहे का?”
पुढे या चित्रपटाबद्दल खंत व्यक्त करत स्वानंद म्हणाले, “एक चित्रपट प्रचंड पैसा कमावत आहे अन् भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास पायदळी तुडवला जात आहे. माझ्या माहितीनुसार हा चित्रपट भारतीय चित्रपटांचं भवितव्य धोक्यात आणणारा ठरेल.” ‘अॅनिमल’मध्ये वडील-मुलाच्या एका विचित्र नात्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटात भरपुर बोल्ड सीन्स, किसिंग सीन्स तसेच रक्तपात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे या चित्रपटावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. चित्रपटात रणबीरसह रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ति कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.